घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 02:24 AM2017-11-08T02:24:47+5:302017-11-08T02:25:02+5:30
घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची घटना खारघर येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरुळ येथे राहणा-या खाजामोईनुद्दीन मुथलीफ (६१) यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यांना चौदा लाखांत घर मिळवून देतो असे एका परिचयाच्या व्यक्तीने सांगितले होते. यानुसार मुथलीफ यांनी सदर व्यक्तीला धनादेशाद्वारे १२ लाख रुपये दिले होते, परंतु रक्कम घेवूनही त्यांना घर मिळत नव्हते. यामुळे त्यांनी सदर व्यक्तीकडे घरासाठी पाठपुरावा केला असता, त्याने सुरवातीचे काही दिवस त्यांना आश्वासन देवून बोळवण केली. मात्र पैसे देवून बराच कालावधी उलटत चालला होता.
यामुळे मुथलीफ यांनी घर मिळावे यासाठी संबंधिताकडे तगादा सुरु ठेवला होता. यावेळी त्यांनी ज्याच्यासोबत व्यवहार करत आहोत त्याच्याविषयीची आवश्यक माहिती देखील मिळवलेली नव्हती. अखेर त्यांनी घराऐवजी घरासाठी दिलेली रक्कम परत मिळावी यासाठी त्याच्याकडे पाठपुरावा केला, परंतु टाळाटाळ केली.
अखेर दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी संबंधिताकडे पाठपुरावा केला असता त्याने पोबारा केला आहे. यामुळे झालेल्या फसवणुकीची तक्रार खारघर पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार खारघर पोलिसांत सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.