नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यातील लाखो मराठी नागरिक आंदोलनासाठी नवी मुंबईत दाखल झाल्यानंतर शहरवासीयांनी सहकुटुंब सहपरिवार आंदोलनात सहभाग घेतला होता. दोन वर्षाच्या लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत घरातील सर्व सदस्यांसह अनेकांनी बाजार समितीमध्ये हजेरी लावली होती.
कोपरखैरणे मध्ये राहणारे व मुळचे जुन्नरमधील रहिवासी असलेले विशाल शिंदे त्यांच्या दोन वर्षाचा मुलगा देवराज व मुलगी देवांशी यांना घेवून मध्यरात्रीही बाजार समितीमध्ये हजर झाले होते. पत्नी, भाऊ, चुलत भाऊ व इतर सर्व सदस्यांसह शिंदे कुटुंबीय मार्केटमध्ये हजर होते. ऐतीहासीक आंदोलनाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही आलो आहोत. आरक्षण हवे मग आंदोलनात सर्वांनी सहभागी झालेच पाहिले. फक्त बोलून नाही तर कृतीमधून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घरातील सर्वजण आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दामिनी डुंबरे यांनीही सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले पाहिजे अशी भुमीका मांडली.
अशाच पद्धतीने शेकडो नवी मुंबईकर घरातील सदस्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांना जेवण वाढण्याबरोबर इतर सर्व प्रकारची मदत त्यांच्याकडून केली जात होती.