रेल्वे स्थानकातील पंखे ‘कव्हर’बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:05 AM2018-10-15T01:05:23+5:302018-10-15T01:05:40+5:30
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकातील बहुतांश फलाटांवर नवे पंखे बसवण्यात आले आहेत; परंतु तीन महिन्यांपासून ...
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकातील बहुतांश फलाटांवर नवे पंखे बसवण्यात आले आहेत; परंतु तीन महिन्यांपासून अधिक कालावधी होऊन देखील त्यावरील प्लॅस्टिकचे कव्हर देखील काढण्यात आलेले नाहीत. यामुळे पंख्यांचा वापर करण्यासाठी प्रशासनाकडून नेमका विलंब का होत आहे याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था आहे.
ऐन आॅक्टोबर हीटमध्ये ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना रेल्वेस्थानकात फलाटांवर देखील गरमीचा त्रास सहन करावा लागत आहे. सानपाडा स्थानकासह काही स्थानकातील फलाटांवरील जुने पंखे बदलून नवे बसवण्यात आले आहेत; परंतु तीनपेक्षा जास्त महिन्यांचा कालावधी होऊन देखील त्यांचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. या पंख्यांचा वापर करायचा की नाही याबाबत प्रशासनच अंधारात असल्याने त्यावरील प्लॅस्टिकचे कव्हर देखील काढण्यात आलेले नाहीत. परिणामी बसवलेले पंखे केवळ दिखाव्यासाठी आहेत की सुविधेसाठी असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. मात्र सुस्त कारभारामुळे जाब विचारायचा तर कोणाला असाही प्रश्न रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
सध्या आॅक्टोबर हीटने प्रवासी त्रस्त असून, किमान फलाटावर तरी खेळती हवा राहावी अशी त्यांची अपेक्षा आहे. याकरिता पंखे महत्त्वाचे असतानाही ते बसवून देखील त्यांचा वापर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे पंख्यांवर झालेला खर्च व्यर्थ घालवला जाणार आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी जुने पंखे असूनही ते देखील वापराविना पडून आहेत. यामुळे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांच्या सुविधांना बगल देत गैरसोयींच्या कचाट्यात ढकलले जात असल्याचाही आरोप होत आहे.