बाप्पाकडे कोरोनामुक्तीचा आशीर्वाद! नवी मुंबईत अनंत चतुर्दशी दिनी ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना शांततेत निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:06 AM2020-09-03T01:06:29+5:302020-09-03T01:06:52+5:30
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षी श्रीगणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.
नवी मुंबई : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नियमांच्या चौकटीत संपन्न झाला. अनंत चतुर्दशी दिनी शहरातील घरगुती आणि सार्वजनिक अशा ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये ५४ टक्के मूर्तींचे विसर्जन करीत नागरिकांनी पर्यावरणशीलतेचे दर्शन घडविले.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षी श्रीगणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संकट असल्याने यंदा शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी दिड दिवसांचा उत्सव साजरा केला, तर अनेकांनी या वर्षी गणेशोत्सव साजरा केला नाही. संपूर्ण विश्वावरील हे कोरोनाचे संकट दूर करा, अशी मागणी करीत, आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये ‘पुढल्या वर्षी लवकर या’ अशी श्रीगणरायाकडे प्रार्थना केली आणि विसर्जनाच्या इतर ४ दिवसांप्रमाणे अनंत चतुर्दशी दिनीही भक्तिमय अंत:करणाने श्रीगणेशाला निरोप दिला.
नवी मुंबई महापालिकेमार्फत सर्व विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या सुयोग्य व्यवस्थेमध्ये एकूण ४,३०४ घरगुती व ३२ सार्वजनिक अशा एकूण ४,३३६ मूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये पारंपरिक २२ मुख्य विसर्जन स्थळांवर २,१४० घरगुती, तसेच १८ सार्वजनिक अशा २,१५८ श्रीमूर्तींचे, तसेच १३५ कृत्रिम विसर्जन तलावांवर २,१६४ घरगुती व १४ सार्वजनिक २,१७८ मूर्तींचे विसर्जन झाले.
शहरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये श्रीमूर्ती संकलन करण्यासाठी फिरत्या वाहनांचे नियोजन केले होते. तर, अनेक नागरिकांनी घरीच विसर्जन केले. विसर्जन स्थळांवर आलेले बहुतांशी नागरिक श्रींची निरोपाची आरती घरीच करून आले होते. वाद्यांच्या गजबजाटाशिवाय अत्यंत शांततेने हा विसर्जन सोहळा पार पडला. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस विभाग सक्षमतेने कार्यरत होता.
पनवेलमध्ये बाप्पांना शांततापूर्वक निरोप
पनवेल : दहा दिवसांच्या बाप्पांना मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शांततापूर्वक भावनिक निरोप देण्यात आला. बहुतांशी नागरिकांनी आपल्या घरातच कृत्रिमरीत्या तयार केलेल्या विसर्जन ठिकाणी बाप्पांचे विसर्जन केले. पालिकेने ४१ ठिकाणी कृत्रिम विसर्जन घाट तयार केले होते. या विसर्जन घाटांवर नेमलेल्या स्वयंसेवकामार्फत नागरिकांनी बाप्पाचे विसर्जन केले. सिडको, पालिका प्रशासन आदींच्या वतीने विसर्जन घाटांवर व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी सूचना देण्यासाठी विसर्जन घाटांवर पोलीसही उपस्थित होते. निवडक लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असल्याने कुठेही गर्दी पाहावयास मिळाली नाही.
विसर्जन स्थळी नियोजनबद्ध व्यवस्था
मुख्य विसर्जन स्थळांवर विसर्जनाकरिता तराफ्यांची व फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने काठांवर बांबूचे बॅरिकेटिंग करण्यात आले होते, तसेच विद्युत व्यवस्थेसह अत्यावश्यक प्रसंगी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आलेली होती.
सर्व विसर्जनस्थळांवर पिण्याचे पाणी व प्रथमोपचारासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. १ हजाराहून अधिक स्वयंसेवक, अग्निशमन जवान, लाइफ गाडर््स दक्षतेने तैनात होते.
निर्माल्यावर होणार खतनिर्मिती प्रक्रिया
सर्व विसर्जन स्थळी ओले व सुके निर्माल्य ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले होते व हे निर्माल्य वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. अनंत चतुर्दशी दिनी ५ टन २५ किलो निर्माल्य जमा झाले असून, दीड दिवसांपासून अनंत चतुर्दशीच्या विसर्जनापर्यंत एकूण २५ टन ७८५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर तुर्भे प्रकल्प स्थळी स्वतंत्र खतनिर्मिती प्रक्रिया करण्यात येत आहे.