पनवेल : बुधवारी मध्यरात्रीच सुरू झालेल्या सैन्यभरतीसाठी पहिल्या दिवशी ४ हजार उमेदवारांनी हजेरी लावले. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अॅकॅडमीमध्ये ही भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेत सुमारे पन्नास हजार उमेदवार भाग घेणार आहेत. ही भरती मोहीम केवळ सहा जिल्ह्यांकरिता मर्यादित आहे. बुधवारच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
या ठिकाणी दररोज पाच हजार उमेदवारांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी साडेचार हजार उमेदवारांनी हजेरी लावली. रात्री बारा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत उमेदवारांची फिजिकल फिटनेस चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा निकाल लगेच जाहीर करण्यात आला. त्यानंतर धावण्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेडिकल करण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नियोजनाचा एक भाग म्हणून शासकीय अधिकारी व कर्मचारीसुद्धा या ठिकाणी तैनात केल्याची माहिती पनवेलचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली.