शेतकरी दोन वर्षांपासून मारतोय पनवेल तहसीलमध्ये खेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:27 AM2019-04-02T03:27:08+5:302019-04-02T03:27:28+5:30
सातबारा दुरुस्तीची मागणी : दलालाची मध्यस्थी न घेतल्याने विलंब
वैभव गायकर
पनवेल : सरकारी कामात पारदर्शकता यावी, ती त्वरित व्हावी, यासाठी कार्यालये संगणकीकृत करण्यात आली आहे. एका क्लिकवर कामे होऊ लागल्याचे सामान्य नागरिकांचा वेळ वाचू लागला आहे. मात्र पनवेल तहसील कार्यालयाच्या वेळकाढू धोरणाचा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे.
पनवेल तालुक्यातील पिसार्वे गावातील शेतकरी पांडुरंग रामा महादे यांच्या मालकीच्या जमिनीवर बोजा उतरवण्यासाठी ते तलाठ्यापासून तहसीलदारापर्यंत गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रत्येकवेळी नवीन तारीख दिली जात असल्याने महादे संतप्त झाले आहेत. जमिनीवर घेतलेल्या कर्जाची नोंद सातबारावर बोजा म्हणून केली जाते. पूर्वी शेतकरी अशाप्रकराचे बोजा घेत असत. मात्र बोजा उतरवूनही सातबारावरून नोंद हटविली जात नसे. असाच प्रकारे पनवेल तालुक्यातील मौजे पिसार्वे येथील शेतकरी पांडुरंग रामा महादे यांच्या सर्व्हे नंबर ८६ /३/अ क्षेत्र २-२१-६० या मिळकतीसंदर्भात तहसील कार्यालय पनवेल येथे २३ आॅगस्ट २०१८ रोजी अर्ज केला होता. संबंधित जमिनीवर रामचंद्र काशिनाथ अमृते यांचा तारणबोजा राहिला आहे. शहानिशा करून तो कमी करण्यात यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली. यानंतर तहसील कार्यालयामार्फत संबंधित विभागाचे तलाठी तळोजे पाचनंद यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तलाठ्यांनी पंचनामा करून अहवालही सादर केला. मात्र दोन वर्षे उलटून यावर पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महादे तहसील कार्यालयात खेटे मारत आहेत.
आश्चर्य म्हणजे, संबंधित प्रकरणाचा अहवाल दोन वेळा तहसील कार्यालयातून गहाळ झाला आहे. प्रत्येक वेळेला चौकशी करायला गेल्यास संबंधित अधिकारी नवीन कारण सांगत असल्याचे महादे सांगतात.
दलालांची मध्यस्थी नसल्याने कामाला उशीर
पनवेल तहसील कार्यालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी जमिनी घेतल्या आहेत. अवघ्या काही दिवसात त्यांच्या जमिनीची प्रक्रिया पूर्ण होऊन विविध गृहप्रकल्प उभे राहत आहेत. मात्र शेतकऱ्याला वेगळा न्याय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दलालांच्या मध्यस्थीने काम केले नाही म्हणून उशीर करण्यात येत असल्याचे शेतकºयाचे म्हणणे आहे.
सतत दोन वर्षे पनवेल तहसील कार्यालयात खेटे मारत आहे. विशेष म्हणजे संबंधित प्रकरणाचा अभिप्राय तहसील कार्यालयात सादर करून देखील उशीर का होतो, हेच कळत नाही. दोन वर्षात अनेकदा फेºया मारून देखील उपयोग झाला नाही.
- पांडुरंग महादे,
शेतकरी, पिसार्वे गाव