शेतकरी नेते तुपकरांना खालापूरमध्ये रोखले; आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, रविकांत तुपकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:02 IST2025-03-20T10:01:56+5:302025-03-20T10:02:33+5:30
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे ३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या होत्या.

शेतकरी नेते तुपकरांना खालापूरमध्ये रोखले; आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न, रविकांत तुपकर यांचा आरोप
राकेश खराडे
मोहोपाडा : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाण्यातून काढण्यात आलेला मोर्चा बुधवारी सकाळी खालापूर पोलिसांनी अडविला. त्यानंतर तुपकरांसह १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दाेन तास रोखून ठेवले होते. गनिमी काव्याने ते मुंबईत दाखल होणार होते.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे ३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बुलढाणा जिल्ह्यातून सुमारे २५० वाहनांतून शेकडो शेतकरी मुंबईला जाणार होते. त्यांना खालापूर तालुक्यातील नढाळ येथे पोलिसांनी रोखले. आम्ही शांतता व सनदशीर मार्गाने आंदोलन करणारच म्हणत हे कार्यकर्ते गनिमी पद्धतीने मुंबईत दाखल होणार होते. त्यामुळे पोलिसांनी तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना नढाळ येथील मंदिरात रोखून धरले होते.
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न : रविकांत तुपकर
प्रचंड पोलिस बंदोबस्ताद्वारे आमचे आंदोलन चिरडण्याचा सरकार प्रयत्न करत असेल तर आम्ही सरकारला सांगू आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला मारून टाका. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. अरबी समुद्रात कर्जांचे सातबारा सोडून आम्ही कर्जमुक्त झालो, अशी घोषणा करण्याची आमची भूमिका आहे, असे रविकांत तुपकर यांनी खालापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.