उरण : वातावरणात सातत्याने होणारे बदल, समुद्रात घोंघावणारे वादळांचे वाढते प्रमाण, डिझेल परतावे मिळण्यास दोन-दोन वर्षे होणारा विलंब, परराज्यातील मच्छिमारांचे आक्रमण, मत्स्य दुष्काळ आणि एलईडी मासेमारीचे वाढते प्रस्थ अशा सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमुळे राज्यातील लाखो मच्छीमार आणि मत्स्य व्यावसायिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांनाही आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी विनंती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे.
राज्याला ७२० किमीचा सागरी किनारा लाभला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. यामध्ये आता दिवसेंदिवस विविध समस्यांची भर पडत चालली आहे. पावसाळी मासेमारी बंदीनंतर मासेमारीचा हंगाम सुरू होताच बदलत्या हवामानाचा जबरदस्त फटका मच्छीमारांना बसला आहे. यामध्ये लागोपाठ आलेल्या वादळे-चक्रीवादळामुळे मासेमारी व्यवसायच बंद ठेवण्याची पाळी राज्यातील मच्छीमारांवर आली. मत्स्य दुष्काळामुळे मच्छीमारांना खर्चही निघेनासा झाला आहे.नैसर्गिक आपत्तीनंतर मच्छीमारांना मानवनिर्मित अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. राज्यातील लाखो मच्छीमारांसाठी आर्थिक आधार ठरत असलेला डिझेल परताव्याच्या रकमेसाठी दोन- दोन वर्षे विलंब होत आहे. सागरी हद्दीत मिळणाºया मासळीच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पारंपरिक आणि प्रगतशील मच्छीमारांमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहे. राज्याच्या सागरी जलाधीक्षेत्रात मासळी कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे परराज्यातील मच्छीमार बोटी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राजरोसपणे मासेमारी करीत आहेत. आपल्याच राज्याच्या हद्दीतून लाखो टन मासळी पकडून परराज्यात विक्री केली जात आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांपेक्षा परराज्यातील मासळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे.राज्यातीलच चीन बनावटीच्या अत्याधुनिक अनेक मासेमारी हायस्पीड मदर बोटी मोठमोठे विद्युत जनसेटवर व एलईडी लाईट लाऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करीत आहेत. वर्षभरातील हंगामात मिळणारी मासळी एलईडीधारक एक महिन्यातच करून पलायन करीत आहेत.याचा परिणाम पारंपरिक पद्धतीने आणि प्रगतशिल मच्छीमारी करणाºया मच्छीमारांवर होत आहे. विविध समस्यांमुळे राज्यातील मच्छीमारांवर आलेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी, राज्यातील मच्छिमारांना शेतकºयांप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी,या मागणीचे निवेदन करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन दिले.याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्षनरेश कोळी, गोरक्ष नाखवा, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.