नवी मुंबईमध्ये भरला शेतकरी फुलबाजार; झेंडूला प्रतिकिलो ६० ते १०० रुपये भाव

By नामदेव मोरे | Published: October 23, 2023 04:59 PM2023-10-23T16:59:23+5:302023-10-23T16:59:36+5:30

पुणे जिल्ह्यातील शेतकरी स्वत:च बनले विक्रेते

Farmer's flower market filled in Navi Mumbai; The price of marigold is Rs 60 to 100 per kg | नवी मुंबईमध्ये भरला शेतकरी फुलबाजार; झेंडूला प्रतिकिलो ६० ते १०० रुपये भाव

नवी मुंबईमध्ये भरला शेतकरी फुलबाजार; झेंडूला प्रतिकिलो ६० ते १०० रुपये भाव

नवी मुंबई : दसऱ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा फुलबाजार भरला आहे. वाशी, सानपाडा, नेरूळसह विविध ठिकाणी पुणे जिल्ह्यातील शेतकरी स्वत:च फुलांची विक्री करत आहेत. ६० ते १०० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. स्वत:च विक्री केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असून ग्राहकांनाही कमी दरामध्ये फुले उपलब्ध होत आहेत.

घर, दुकाने, वाहनांना दसऱ्याचे तोरण बांधण्यासाठी झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, घोडेगाव परिसरामध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. पूर्वी शेतकरी मुंबईमधील फुलबाजारात फुले विक्रीसाठी पाठवायचे. पण अनेक वेळा हंगामामध्ये बाजारभाव पडतात व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. यामुळे आता शेतकरी स्वत:च नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये चौक, पदपथ व जिथे जागा मिळेल तेथे फुलांचा व्यवसाय करत आहेत. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये यावर्षीही घोडेगाव, खेड परिसरातून शेतकरी फुलांचा व्यापार करण्यासाठी आले आहेत.

यावर्षी फुलांचे दरही नियंत्रणात आहेत. शेतकरी ६० ते १०० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री करत आहेत. अनेक शेतकरी स्वत: फुलांच्या माळा तयार करून त्यांची विक्री करत आहेत. शेतकरी दोन दिवसच येथे व्यवसाय करण्यासाठी येत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनही त्यांना योग्य सहकार्य करत असते. शेतकऱ्यांना कोणताही उपद्रव होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

प्रत्येक वर्षी दसरा व दिवाळीला फुलांची विक्री करण्यासाठी नवी मुंबईमध्ये येत असतो. यावर्षीही गावातील अनेक शेतकरी स्वत: फुले विक्रीसाठी घेवून आले आहेत. येथे महानगरपालिका प्रशासनाकडूनही चांगले सहकार्य मिळत असते. - तुषार टोके, शेतकरी, खेड

Web Title: Farmer's flower market filled in Navi Mumbai; The price of marigold is Rs 60 to 100 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.