मराठवाड्याचे शेतकरी म्हणतात, माघार नाहीच; खिशातील पैसे खर्च करून आंदोलनात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:07 AM2024-01-26T08:07:07+5:302024-01-26T08:07:15+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती.
नवी मुंबई : हटायचे नाही, झुकायचे नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार जालना, परभणी, नांदेडसह मराठवाड्यातून आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक गावातून घराघरातून नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. खिशातील पैसे खर्च करून वाहनांचा बंदोबस्त केला आहे. जेवणापासून राहण्यापर्यंत सर्व तयारी करूनच लढ्यात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती. अनेक जण १७ जानेवारीपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणची तयारी, वैद्यकीय तपासणी व इतर आवश्यक कामे करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. या सर्वांची मसाला मार्केटमध्ये सोय केली होती. माथाडी कामगार, व्यापारी व सकल मराठा समाजाने या सर्वांच्या अंघोळ, पाणी व जेवणाची सोय केली होती. मराठा आंदोलनाच्या लढ्यामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.
मराठा क्रांती मोर्चा व त्या अगोदरपासूनही चळवळीमध्ये सक्रिय आहे. आता निर्णायक लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी ते नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासामध्ये दिवसेंदिवस आंदोलनाला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.
प्रत्येक गावातील मराठा समाजातील तरुण आंदोलनात सहभागी झाले आहेत. आम्ही स्वखर्चाने गाडी करून आलो असून, आरक्षण मिळेपर्यंत लढ्यात सहभाग कायम असेल.
- गणेश पाचकोट, परभणी
शेतात काही पिकत नाही. मुलांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत. शिकलेल्या मुलांना नोकरी नाही. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आता माघार घ्यायची नाही.
- माधव कदम, बोर्डा, गंगाखेड, परभणी
मराठा आरक्षणासाठीच्या आतापर्यंतच्या सर्व लढ्यात सहभागी होत आलो आहे. लढा आता निर्णायक टप्प्यात आला असून, आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. - सोपान क्षीरसागर, जालना