सिडकोच्या आरपीझेडसाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम, १५००वर शेतकऱ्यांनी नोंदवल्या हरकती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 09:05 PM2022-10-27T21:05:46+5:302022-10-27T21:06:50+5:30
उरण तालुक्यातील ११ हजार हेक्टर पेक्षा अधिकची जमीन सिडकोने १९७० मध्येच नवी मुंबईच्या विकासाच्या नावाने संपादीत केली आहे. त्यानंतर ५२ वर्षांनी पुन्हा एकदा उरण मधील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादीत करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
मधुकर ठाकूर -
उरण : सिडकोच्या आरपीझेड प्रकल्पासाठी भू-संपादनाला विरोध करत उरण येथील नागाव, चाणजे, रानवड, बोकडविरा, फुंडे, नवघर, पाणजे आदी गावातील १५०० शेतकऱ्यांनी गुरुवारी (२७) सिडको भवनावर हल्लाबोल करत हरकती नोंदविल्या. सिडकोने उरण तालुक्यातील चाणजे मधील ९९१, नागाव- १२७, रानवड- १६०, बोकडविरा- ३३, पाणजे - ३ व फुंडे येथील ४ आणि नवघरमधील २ अशा एकूण १ हजार २२० सर्व्हे नंबर मधील ३६६ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी वर्तमानपत्रातून जाहीर केले होते.
उरण तालुक्यातील ११ हजार हेक्टर पेक्षा अधिकची जमीन सिडकोने १९७० मध्येच नवी मुंबईच्या विकासाच्या नावाने संपादीत केली आहे. त्यानंतर ५२ वर्षांनी पुन्हा एकदा उरण मधील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनी संपादीत करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या तील अनेक सर्व्हे नंबर मध्ये शेतकऱ्यांनी स्वतःसाठी बांधलेली तसेच विविध विभागातील स्थानिक नागरिकांनी शेतकऱ्याकडून जमिनी खरेदी करून घरांचे बांधकाम केले आहे. अशा प्रकारची हजारो घरे या जमिनीवर आहेत. सिडकोच्या या भूसंपदानाच्या प्रक्रियेमध्ये या राहत्या घरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उरणमधील शेतकरी व नागरिकांकडून विरोध करत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
सिडकोच्या भूसंपदानाच्या अधिसूचनेनुसार गुरुवारी १५ दिवस पूर्ण झाल्याने उरण मधील शेतकरी सिडकोच्या भूसंपदान विभागाला आपल्या वैयक्तिक हरकती नोंदविण्यासाठी सीबीडी बेलापूर येथील कॉ. भाऊ पाटील चौकात एकत्र आले होते. त्यांनी सिडकोच्या कार्यालयात जाऊ नयेत यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. मात्र सिडकोच्या विरोधात संतप्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी सुरक्षा यंत्रणांना बाजूला सारून मिरवणुकीने सिडको भवनाच्या प्रवेशद्वारावर धडक दिली. मात्र सिडकोच्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली.
सिडकोच्या आरपीझेड प्रकल्पासाठी भू-संपादनाच्या अधिसूचनेला विरोध दर्शवित १५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी निषेध नोंदवत हरकती सादर केल्या आहेत. त्याचवेळी गावठाण हक्क परिषद व चाणजे शेतकरी समितीने केलेल्या मागणी नुसार सिडकोच्या भूसंपादन व भूमापन विभागाने शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
याप्रसंगी कामगार नेते भूषण पाटील, सुधाकर पाटील, रामचंद्र म्हात्रे,संजय ठाकूर, ॲड. दीपक ठाकूर, नागाव सरपंच चेतन गायकवाड, म्हातवली सरपंच रंजना पाटील, केगाव सरपंच चिंतामण पाटील, चाणजे शेतकरी समितीचे श्रीराम म्हात्रे,अरविंद घरत,चारुदत्त पाटील,काका पाटील, काशिनाथ गायकवाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.