गॅस प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट

By admin | Published: January 9, 2017 06:22 AM2017-01-09T06:22:48+5:302017-01-09T06:22:48+5:30

हेटवणे धरण प्रकल्पाच्या ओलिताखालील समृद्ध अशा शेतजमिनीतून जाणाऱ्या इथेन गॅस पाइप लाइनच्या मोजणीचे काम गरीब आदिवासी

Farmers unite against gas project | गॅस प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट

गॅस प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट

Next

पेण : हेटवणे धरण प्रकल्पाच्या ओलिताखालील समृद्ध अशा शेतजमिनीतून जाणाऱ्या इथेन गॅस पाइप लाइनच्या मोजणीचे काम गरीब आदिवासी शेतकऱ्यांना आमिष दाखवून केले जात आहे. समृद्ध शेती व शेतकरी असलेल्या या सुवर्ण भूमीतून या ज्वालाग्राही इथेन वायुवाहिनीच्या कामासाठी राजकीय विरोध मावळला असल्याने आता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून, रिलायन्स इथेन वायू प्रकल्पाला कर्जतच्या राष्ट्रवादी आ. सुरेश लाड यांनी केलेल्या ठाम विरोधाच्या धर्तीवरच आता पेणचे प्रकल्पबाधित शेतकरी आ. लाड यांची भेट घेणार आहेत. महामुंबई एसईझेड प्रकल्पाविरोधात पेणच्या शेतकऱ्यांनी केलेले आंदोलन, दिलेली न्यायालयीन लढाईची आठवण पुन्हा एकदा या इथेन गॅस प्रकल्पामुळे जागृत झाली आहे. प्रकल्पबाधित शेतकरी इथेन गॅस प्रकल्पाविरोधात लढण्यास सज्ज झाले आहेत.
दहेज गुजरात ते नागोठणे रिलायन्स पेट्रोकेमिकल्स या प्रकल्पात येणारा इथेन गॅसच्या विक्री व्यवसायातून रिलायन्सचे मालक मालामाल होणार आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून ही वायुवाहिनी जाणार आहे. त्यांना कवडीमोल दराने भाडेतत्त्वावर भूसंपादन करून शेतकऱ्यांना ७/१२ उताऱ्यावर याची कायम नोंद राहणार आहे. रिलायन्स प्रकल्प विकासकाने पेणच्या २२ गावांतील यापूर्वी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून, त्यांच्या ७/१२वर मालक म्हणून एसईझेड प्रकल्पाचे नाव लावले. शेतकऱ्यांची एवढी मोठी फसवणूक करणाऱ्या रिलायन्स प्रकल्पाच्या विकासकाने गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने न पाळल्याने संबंधित शेतकरी याबाबतची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. ज्या शेतीतून ही वायुवाहिनी जात आहे ती सिंचनाखालील शेतजमीन कोणत्याही प्रकल्पासाठी अधिग्रहण करता येत नाही. या कायद्याचा आधार घेत, आता या प्रकल्पाविरोधात जनआंदोलन उभे करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
यापूर्वी प्रकल्पासाठी (एसईझेड) शेतजमिनी विकलेले शेतकरी व इथेन गॅस वायुवाहिनी बाधित शेतकरी, अशी एकजूट करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने रिलायन्सच्या या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांची मोठी सभा लवकरच घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Web Title: Farmers unite against gas project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.