नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे शहरातील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला असून नवी मुंबईत बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी आठवडे बाजार सुरू आहेत. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा वाढला असून मुलांच्या परीक्षादेखील सुरू असल्याने बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे हे बाजार मंदीत सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना मिळावा यासाठी शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी योजना राज्यशासनाने मागील काही वर्षांपासून अंमलात आणली आहे. या आठवडे बाजारात ग्राहकांना किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला आणि फळे उपलब्ध होत असल्याने या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुंबईतील बेलापूर, नेरूळ, वाशी भागात विविध दिवशी बाजार भरतो. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील सुरू आहेत. त्यामुळे आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. यामुळे बाजारात दुकाने थाटून बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री घटली असून उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा घेऊन जाणे परवडत नाही. यामुळे अनेकवेळा उरलेला शेतमाल फेकून नुकसान सहन करावे लागत असल्याचे शेतकरी दत्ता शिंदे यांनी सांगितले.