मधुकर ठाकूर
उरण : पशुसंवर्धन विभागाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. या नावीन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील शेतकरी पशुपालकांना राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेता येईल.
यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १३ डिसेंबर ते ११ जानेवारी या कालावधी दरम्यान असणार आहे.हे अर्ज AH. MAHABMS या google play स्टेवरील मोबाईल app वर स्वीकारण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यांना शाश्वत अर्थजणाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमाद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान करण्यासाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनांमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे आणि त्यातून लाभार्थींची निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे. यामध्ये शासनाच्या योजनांकरीता अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्याला दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार करण्यात आलेली प्रतीक्षा यादी सन २०२०-२१ पासून पुढील पाच वर्षापर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांच्या प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे समजू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणे आदी योजनांच्या लाभासाठी पशुपालकांना पशुधनासाठी अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे. यात उरण तालुक्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत उरणचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अनिल धांडे चिरनेरचे पशुवैद्यकीय अधिकारी रासडी डाबेराव यांनीही येथील पशुपालकांना आवाहन केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"