नवीन पनवेल : नैनासंदर्भात शेतकऱ्यांची लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. ते विहिघर येथे आयोजित शेतकऱ्यांच्या सभेत बोलत होते. ८ वर्षांपासून नैनाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात आहे. शेतकऱ्याला नैनाकडून जमिनीचे करोडो रुपये भरण्याच्या नोटिसा धाडण्यात आलेल्या आहेत. शनिवारी विहिघर येथील सभेत शेतकऱ्यांनी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना १०० टक्के न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांची घरे जाणार नाहीत व विरार-अलिबाग कॉरिडॉर रस्त्यात घरांचे नुकसान होणार नाही, असे सांगितले. सिडकोने जागा घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना पैसे द्यायला हवे तर इथे शेतकऱ्यांकडूनच पैसे मागितले जात असल्याची व्यथा खुद्द बारणे यांनी मांडली. २०१३ पासून केवळ जमिनीला अटकाव करून ठेवले जात आहे. स्थानिक भूमिपुत्रांना कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. येथील भूमिपुत्र मोठ्या अडचणीत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री शेतकऱ्यांना न्याय देतील आणि शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकऱ्यांना दिले. या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सेनेच्या माध्यमातून सिडकोकडे शेतकऱ्यांची भूमिका मांडल्याचे सांगितले. या वेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, नामदेव फडके, रामदास शेवाळे आदी उपस्थित होते.