फार्महाऊस, रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल

By admin | Published: December 31, 2016 04:33 AM2016-12-31T04:33:32+5:302016-12-31T04:33:32+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आबालवृध्द सरसावले असून, पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. शहरातील फार्महाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट, धाब्यांवर

Farmhouse, resort booking booking | फार्महाऊस, रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल

फार्महाऊस, रिसॉर्टचे बुकिंग फुल्ल

Next

- वैभव गायकर, अरुणकुमार मेहत्रे,  पनवेल, कळंबोली

नववर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आबालवृध्द सरसावले असून, पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. शहरातील फार्महाऊस, हॉटेल्स, रिसॉर्ट, धाब्यांवर या दिवशीचे बुकिंग फुल्ल झाल्याचे पहायला मिळते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून त्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यात बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, रिसॉर्ट्सबरोबरच खासगी फार्महाऊसची संख्या मोठी आहे. नोटाबंदीमुळे नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले तरी नववर्षाच्या स्वागतावर याचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही. अनेकांनी फार्महाऊस, रिसॉर्टमध्ये मनोरंजनाचे बेत आखले असून अ‍ॅडव्हान्स बुकिंग केले आहे. यंदा कर्कश वाद्यांवर बंदी घालण्यात आल्याने या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून त्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
फार्म हाऊसवर डीजेला बंदी असून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. मात्र या परिसरात असलेले रिसॉर्ट्स, हॉटेल्सचे बुकिंग फुल्ल आहेत. गृहसंकुले, इमारतींमध्ये टेरेस पार्ट्या आयोजिल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट मालकांनी रोषणाई केली असून सवलतीही जाहीर केल्या आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई-पुण्याचे अनेक पर्यटक कोकणात दाखल होतात. त्यामुळे द्रुतगती मार्गाबरोबरच मुंबई-गोवा महामार्गावरही वर्दळ वाढली आहे. याठिकाणीही वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी पहावयास मिळत आहे. प्रत्येक नाक्यावर पोलीस बंदोबस्त असणार असून मुख्यत्वे तळीरामांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असणार आहे.

नोटाबंदीतही राजकीय सेलिब्रेशन

- नोटाबंदीचे सावट सर्व क्षेत्राबरोबर सण-उत्सव, कार्यक्रमावर दिसून येत आहे. मात्र पनवेल महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांनी थर्टी फर्स्टच्या जल्लोषाला खऱ्या अर्थाने तारले आहे. प्रभाग, आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांकडून कार्यकर्ते तसेच प्रभागातील तरुणांकरिता ठिकठिकाणी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. २०१६ हे वर्ष हे पनवेलकरांकरिता आव्हानात्मक गेले आहे. अनेक वर्षांपासूनचे पनवेल महापालिकेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्याकरिता तरूणाई उत्सुक असली तरी नोटाबंदीमुळे उत्साहावर मर्यादा आल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रेस्टॉरंट, धाब्यावर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र आगामी निवडणुकांमुळे जल्लोषात भर पडली आहे.

- मनपाच्या प्रभाग प्रारूपाबरोबर आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृत्या लढवत आहेत. इच्छेप्रमाणे सोडत निघाली म्हणून एका माजी नगरसेवकाने चिठ्ठी काढणाऱ्या मुलांना दोन हजार रूपये बक्षिस दिले, तर अनेकांनी फार्महाऊसवर पार्ट्यांचे आयोजन केले आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रभागातील तरूणांकरिता हॉटेल्स बुक करण्यात आले आहे. काही सोसायट्यांमध्ये होणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्टीकरिता माजी किंवा भावी नगरसेवक प्रायोजक आहेत. कार्यकर्त्यांना खूश करण्याकरिता वेगवेगळे मेनू ठेवण्यात आले आहे. शाकाहारी मेनूत शीतपेय, आईस्क्रिमची सोय आहे. एकंदरीतच यावर्षी महानगरपालिका निवडणुकीमुळे थर्टी फर्स्ट जोरात असल्याचे दिसून येत आहे.

- खारघर हिल, कर्नाळा अभयारण्य नो एन्ट्री
निसर्गाच्या सान्निध्यात विविध पार्ट्या करण्याचा मोह काही पर्यटकांना असतो. मात्र हा मोह यावेळी आवरावा लागणार आहे. पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध अशा खारघर हिलसह कर्नाळा अभयारण्य परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

- ‘मद्यपींवर कारवाई करा’
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज आहेत. मात्र शनिवारी मध्यरात्री बेलापूर किल्ला परिसरात होणाऱ्या पार्ट्या, मद्यपान, तरुणांची स्टंटबाजीमुळे अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख बंदोबस्तासाठी शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टने एनआरआय पोलिसांना निवेदन दिले आहे.

- पनवेल तालुक्यात २५० पेक्षा जास्त फार्महाऊस आहेत. याठिकाणी डीजे अथवा कोणतेही वाद्य वाजवण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला आहे. तसेच एकाही ठिकाणी पोलिसांनी अशा प्रकारच्या पार्ट्यांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे याठिकाणी पार्ट्या करणाऱ्यांवर व ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर पोलीस विशेष पथक नजर ठेवणार आहे.

ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर आम्ही केस दाखल करणार आहोत. एकाही फार्महाऊसला आम्ही परवानगी दिलेली नाही. गर्दीच्या ठिकाणी छेडछाड होऊ नये, म्हणून विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, कायद्याचे उल्लंघन करू नये.
- प्रकाश निलेवाड,
सहाय्यक पोलीस आयुक्त,
पनवेल

३१ डिसेंबर रोजी दिवसभर वाहतूक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. मद्यप्राशन करणाऱ्यांवर विशेष लक्ष राहणार आहे. चालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवून आपला जीव धोक्यात टाकू नये.
- विजय कादबाने,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
पनवेल वाहतूक शाखा

Web Title: Farmhouse, resort booking booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.