नवी मुंबईसह पनवेलमध्ये कडक बंदोबस्त; प्रमुख रोडवर नाकाबंदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:02 AM2019-06-19T00:02:48+5:302019-06-19T00:03:06+5:30
दुचाकीसह सर्व वाहनांची तपासणी; महत्त्वाच्या ठिकाणचा बंदोबस्तही वाढविला
नवी मुंबई, पनवेल : कळंबोलीमध्ये सापडलेल्या बॉम्बच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईसहपनवेलमधील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात नाकाबंदी सुरू केली असून वाहनांची तपासणी केली जात होती. मॉल, रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणच्या बंदोबस्तामध्येही वाढ केली होती. शाळांच्या परिसरामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी कळंबोलीमधील शाळेच्या बाहेर बॉम्बसदृश वस्तू आढळली. शाळेतील कर्मचाऱ्याने वेळेत हा प्रकार निदर्शनास आणून दिला. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. शहरात सर्वत्र नाकाबंदी सुरू केली आहे. पोलिसांनी दुचाकी, कार व इतर वाहने थांबवून तपासणी सुरू केली होती.
वाहनधारकांकडील कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवानाही तपासला जात होता. निवडणुका झाल्यानंतर रोडवरील नाकाबंदी काही प्रमाणात शिथिल झाली होती. ती पुन्हा कडक केली आहे. वाहनांमध्ये संशयास्पद काय आढळत आहे का याचीही पाहणी केली जात होती. दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सिडको, महापालिका व खासगी व्यक्तींनी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमधील आरोपींना शोधण्यासाठीही सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे सर्व पथक, मुंबई एटीएसचे पथक सर्व यंत्रणा या गुन्ह्याचा उलगडा लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. खोपटामध्ये घडलेली घटना ताजी असताना पुन्हा कळंबोलीमध्ये प्रत्यक्ष बॉम्बसदृश वस्तू आढळली आहे. पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरामधील सर्व मॉलमध्येही मंगळवारी कडक तपासणी केली जात होती. आतमध्ये येणाºया प्रत्येकाची मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी केली जात होती. मॉलच्या पार्किंगमध्ये जाणाºया वाहनांचीही तपासणी केली जात होती. बिटमार्शलच्या विभागामधील फेºयाही वाढविण्यात आल्या आहेत. रेल्वे स्टेशनमध्येही बंदोबस्त कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कळंबोलीमधील घटना शाळेच्या प्रवेशद्वारावर घडली असल्यामुळे नवी मुंबईमधील सर्व खासगी व शासकीय शाळांच्या व्यवस्थापनांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रेल्वेस्टेशनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
नवी मुंबईमधील रेल्वेस्टेशनच्या सुरक्षेविषयी निष्काळजीपणा सुरूच आहे. रेल्वेस्टेशनमधील बंकर नादुरुस्त आहेत. येणाºया जाणाºया प्रवाशांवर फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. अनेक पोलीसस्टेशनमध्ये पोलीस कर्मचारीही उपस्थित नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्टेशन आवारामध्ये कॅमेरे बसविण्यात आले असले तरी इतर काहीही बंदोबस्त दिसत नाही. अजून बंदोबस्त वाढविण्याची गरज असल्याचे मत प्रवासीही व्यक्त करू लागले आहेत.
पनवेल परिसरात वाढताहेत दहशतवादी कारवाया
- वैभव गायकर
पनवेल : कळंबोलीत बॉम्ब सापडल्याने पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे. येथील शाळेतील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे ही घटना निदर्शनास आल्याने अनुचित प्रकार टळला. मात्र, पनवेल शहराची मेट्रो सिटीकडे होणारी वाटचाल लक्षात घेता, नजीकच्या काळात दहशतवादी कारवाया वाढत चालल्याचे दिसून येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात पनवेल तालुक्यातील आपटा याठिकाणी जिवंत आयईडी बॉम्ब सापडल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे लागले होते. कर्जत- आपटा या बसमध्ये हे बॉम्ब सापडले होते. त्यानंतर कळंबोलीमधील हा प्रकार लक्षात घेता दहशतवादी पनवेल परिसरात सक्रिय तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इसिसच्या दहशतवाद्यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी कर्नाळा परिसराची रेकी केली होती. दहशतवाद्यांना कर्नाळा परिसरात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प बनवायचे होते असा याच्यामागे तर्कवितर्क लावला जात होता. सध्या पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असून आंतराष्ट्रीय विमानतळ, विकासाची अनेक कामे, रेल्वेचा विस्तार, मेट्रो, अनेक मोठमोठे गृहप्रकल्प याठिकाणी उभे राहत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या संधी लक्षात घेता देशभरातील नागरिक या परिसरात स्थायिक होत आहेत.
कळंबोलीत सापडलेला बॉम्ब सुधागड शाळेच्या परिसरात आढळला असून सर्वच तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे. पनवेल शिक्षणाचे माहेरघर म्हणून नव्याने उदयास येत आहे. तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. खासगी शाळांची संख्या मोठी आहे. त्यातच एखाद्या शाळेच्या आवारात बॉम्बसदृश वस्तू सापडणे चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे एटीएसचे प्रमुख देवेन भारती हे मंगळवारी कळंबोलीत दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडून घेतला.
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. पोलिसांच्या वेळोवेळी कारवाईत हे बाब सिद्ध झाली आहे. अशा अनधिकृतरीत्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर आवर घालण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पनवेल शहर प्रचंड व्यस्त होणार आहे. अशा परिस्थितीत शहराच्या जडणघडणीतच पोलीस प्रशासनाने सर्व बाबींवर बारकाईने लक्ष दिल्यास भविष्यातील धोका टाळता येईल.
शाळा परिसरामध्ये विशेष काळजी
कळंबोलीतध्ये शाळेच्या परिसरामध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळली होती. यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या परिसरामध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन व पालकांनीही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, थोडे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. दिवसभर शाळेत विद्यार्थ्यांना घालविण्यासाठी गेलेल्या पालकांमध्येही कळंबोलीमधील घटनेची चर्चा सुरू होती.