पोर्टविरोधात उपोषण, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:40 PM2018-10-25T23:40:00+5:302018-10-25T23:40:02+5:30
उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिंगापूर पोर्ट विरोधात गुरुवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उरण : उरण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सिंगापूर पोर्ट विरोधात गुरुवारी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरण विधानसभा अध्यक्षा भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली बंदराच्या प्रवेशद्वारावरच सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणात अनेक महिलाही सहभागी झाल्या आहेत.
१७ प्रकल्पबाधित मुलींना त्वरित कामावर घेणे, १८ गावांतील प्रकल्पग्रस्तांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, परप्रांतीयांना नोकरीवरून कमी करून तेथे प्रकल्पग्रस्तांची भरती करावी, ‘अ’ कॅटेगरी व मुलाखत झालेल्या ४३५ उमेदवारांना नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे व इतर मागण्यांंसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली.
या उपोषणात भावना घाणेकर यांच्यासह उरण शहराध्यक्ष चेतन म्हात्रे, कलावती परशुराम भोईर, जयवंती पाटील, वत्सला पाटील, अनिता पाटील, चंद्रावती पाटील आदी सहभागी झाले आहेत.
उपोषणकर्त्यांची भेट घेऊन माजी आ. विवेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जेएनपीटी कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, सामाजिक संघटनेचे संतोष पवार आणि इतर विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.