नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांपैकी पुनर्वसनाच्या लाभापासून वंचित नागरिकांनी २३ डिसेंबरपासून बेमुदत मुक्काम मोर्चा सुरू केला आहे. २६ व्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे. गुरुवारपासून १३ प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषणही सुरू केले आहे. प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीने हे आंदोलन सुरू केले आहे. लाभापासून वंचित राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी लढा सुरू करण्यात आला आहे. शेकडो प्रकल्पग्रस्त २६ दिवसांपासून सिडको भवनसमोर ठाण मांडून बसले आहेत. आतापर्यंत सिडको प्रशासनाचे चार वेळा प्रकल्पग्रस्तांबरोबर बैठक घेतली आहे. प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे; परंतु प्रत्यक्षात कोणताही प्रश्न सोडविलेला नाही, यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्र यांनीही आंदोलकांशी चर्चा केली आहे. सर्व मागण्या ऐकून घेतल्या असल्यातरी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.
सिडको प्रशासन प्रश्न सोडविण्यास दिरंगाई करत असल्यामुळे १३ प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मुक्काम मोर्चाही सुरूच राहणार आहे. अखिल भारतीय किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मुक्काम मोर्चासह आता आमरण उपोषणही सुरू केले आहे. सिडकोने लवकर सर्व प्रश्न सोडवावे, अशी आमची मागणी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.