उरणमध्ये एपीएम टर्मिनलच्या कामगारांचे भरपावसात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:48 AM2019-07-30T01:48:53+5:302019-07-30T01:48:59+5:30
पुन्हा कामावर घेण्याची मागणी : प्रशासनाकडून आश्वासनांवर बोळवण
उरण : तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल (ओल्ड मर्क्स) या कंपनीतील ९९ कामगारांना ५ फेबु्रवारी २०१८ रोजी कामावरून तडकाफडकी काढण्यात आले होते. त्यांना अद्याप कामावर रुजू करण्यात आलेले नाही. कंपनी प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने निलंबित करण्यात आलेल्या ९९ कामगारांनी सोमवारपासून भरपावसात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.
९ फेब्रुवारी २०१८ रोजी कंपनी प्रशासन, कामगार, लोकप्रतिनिधींची बैठक होऊन १२ मार्च २०१८ रोजी कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्याने कामगारांनी डिसेंबर २०१८ रोजी १३ दिवस साखळी उपोषण केले होते. या वेळी काही कामगारांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात हलविण्यात आले. यापैकी दोन कामगारांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्या वेळी कंपनी प्रशासनाने सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते.
आश्वासनांव्यतिरिक्त काहीही होत नसल्याने कामगारांनी एकत्र येत माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, पागोटे गावचे सरपंच भार्गव पाटील, माजी गाव अध्यक्ष रजनीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सोमवारपासून ओल्ड मर्क्स कंपनीच्या गेटसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. कामगारांना न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर आदीनाही निवेदन दिल्याची माहिती सरपंच अॅड. भार्गव पाटील यांनी दिली.