नवी मुंबई : महानगरपालिकेमधील कंत्राटी कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये ठेकेदाराने गैरव्यवहार केल्याचा आरोप समाज समता कामगार संघाने केला आहे. ठेकेदारावर कारवाई करावी व या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी वाशीतील महापालिका रुग्णालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.
महापालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरूळ, बेलापूर रुग्णालयांमध्ये जवळपास ४५० कंत्राटी कामगार साफसफाईचे काम करत आहेत. ठेकेदाराने कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. यामुळे कामगारांना भविष्यनिर्वाह निधीमधील रक्कम काढताना अडचणी येत आहेत. ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांनाही भविष्यनिर्वाह निधी व ईएसआयसीचा लाभ मिळालेला नाही. यामुळे कामगारांनी उपोषण सुरू केले आहे.
सफाई कामगारांकडून बहुउद्देशीय कामगार म्हणून सर्व प्रकारची कामे करून घेतली जात आहेत. परंतु वेतन मात्र सफाई कामगारांचे दिले जात आहे. या कामगारांना अर्धकुशल कामगारांप्रमाणे वेतन दिले जावे. जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीसाठीचा राहणीमान भत्ता देण्यात यावा अशी मागणीही केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा समाज समता संघ संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिला.