नेरळ येथील शेतकऱ्याचे कुटुंबासह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:00 AM2019-11-06T02:00:54+5:302019-11-06T02:01:07+5:30
जमिनीवर कब्जा केल्याचा दावा : बनावट कागदपत्रे तयार के ल्याचा आरोप
कर्जत : तालुक्यातील खाडेपाडा आणि मानिवली येथे असलेल्या शेतीचा बेकायदेशीर कब्जा घेतल्याचा दावा करून कायदेशीर लढाई लढत असलेल्या शेतकरी कुटुंबाने आता आपल्या हक्कासाठी उपोषण सुरू केले आहे. आपल्या शेतामध्ये शेतकरी कुटुंबाने ४ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले असून, नेरळ पोलिसांकडून उपोषणकर्त्यांची समजूत काढण्यात आली.
नेरळ येथे राहणारे गोविंद मालू डायरे यांच्या कुटुंबाला वारसाहक्कातून मानिवली आणि खाडेपाडा येथे जमीन आली. खाडेपाडा येथे असलेल्या जमिनी आहेत. या जमिनीपैकी खाडेपाडा येथील काही जमीन परस्पर विकली गेली असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. बनावट दस्तावेज बनवून ही जमीन हडप करण्यात आली, असा आरोप गोविंद मालू डायरे आणि कुटुंबाचा आहे. याबाबत त्यांनी रायगड जिल्हाधिकारी आणि सर्व शासकीय विभाग यांच्याकडे अर्ज करून दाद मागितली होती. त्यानंतर भूमी अभिलेखचे उपसंचालक यांच्या आदेशाने जागेवर जाऊन मोजणी केली होती. त्या मोजणी नंतर शासनाने कारवाई करून आपली जागा परत मिळावी, यासाठी अनेक मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खाडेपाडा येथे असलेल्या आपल्या जमिनीवर आपल्या जागेत गोविंद मालू डायरे तसेच त्यांचे कुटुंबीय यांनी उपोषण सुरू केले. गोविंद मालू डायरे यांच्यासह चंद्रकांत मालू डायरे, वामन खंडू डायरे, चंद्रभागा मंगल डायरे आणि सविता डायरे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.
आपल्या कुटुंबावर अन्याय करणाºया भूमिलेख विभागाचे अधिकारी, भूमापक, जमिनीची विक्री करणाºया व्यक्तीवर आणि त्यांना मदत करणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करीत आमरण उपोषणाची नोटीस गोविंद डायरे यांनी दिली होती. यापूर्वीही डायरे यांनी उपोषण केले होते. मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्ते यांची नेरळ पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कारभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक पी. टी. काळे यांनी भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर कर्जत येथील भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी वाय. एस. शेळके यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मोजणी नकाशानुसार पॉइंट टाकून देण्याची तयारी दाखवली; पण आकारफोड होत नाही तोवर आपण उपोषण सोडणार नाही आणि दोषी कर्मचाºयांवर कारवाई होत नाही तोवर आपले आंदोलन सुरू राहील, असा निर्धार व्यक्त केला.