विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी उपोषण; सूचना हरकतीसाठी वाढीव मुदतीची मागणी
By नामदेव मोरे | Published: October 5, 2022 05:57 PM2022-10-05T17:57:19+5:302022-10-05T17:58:36+5:30
विकास आराखड्याच्या जनजागृतीसाठी वाशीमध्ये उपोषण सुरू आहे.
नवी मुंबई : महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखडा मराठीतून प्रसिद्ध करावा, त्याविषयी जनजागृती केली जावून व सूचना हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांनी वाशीमध्ये उपोषण केले. विकास आराखड्यावर नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती मांडण्याचे आवाहन केले. ९ दिवसांच्या जागृतीमधून नागरिकांनी साद केलेल्या १२ हजार सूचना व हरकतींची निवेदने गुरूवारी मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
विकास आराखड्याविषयी नवी मुंबईकरांमध्ये जागृती करण्यासाठी नवरात्रौत्सवामधील ९ दिवस बेलापूर ते दिघा पर्यंज जागर जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. आराखड्यामध्ये काय आहे व काय हवे होते याविषयी माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रत्येक नागरिकाने आराखडा वाचून त्यावर हरकती नोंद कराव्या असे आवाहन करून सह्यांची मोहीमही राबविण्यात आली. दसऱ्यादिवशी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपोषण करण्यात आले. या उपोषणस्थळी आमदार गणेश नाईक यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट दिली. सिडको व महानगरपालिकेमध्ये मागील अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. या गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. गैरकारभार करणारांविरोधात अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे. एमआयडीसीमधील जोड रस्त्यावरील भूखंड विक्री करण्यात आले आहेत. विकास आराखड्यावर नागरिकांना सूचना हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणीही केली.
महानगरपालिकेचे माजी आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचना व हरकतीसाठी मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्यक्षात मुदतवाढ देण्यात आलेली नाही. लवकरात लवकर मुदत वाढ दिली जावी. विभाग स्तरावर जनजागृती करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. ९ दिवसांमधील जनजागृतीमधून नागरिकांनी दिलेल्या १२ हजार हरकतींचीच्या प्रती आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे दशरथ भगत यांनी स्पष्ट केले. माजी खासदार संजीव नाईक यांनीही विकास आराखड्याला मुदतवाढ देण्याची मागणी केली. यावेळी नागरिकांनी दिलेल्या हरकतींच्या पत्रांनी दशरथ भगत यांची तुला करण्यात आली. आंदोलनस्थळी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, नेत्रा शिर्के, संपत शेवाळे, प्रभाकर भोईर, राजेश शिंदे, राजेंद्र इंगळे, विजय वाळुंज, सुनील नाईक, दिपक पाटील, निशांत भगत, वैजयंती भगत,रूपाली भगत, फशीबाई भगत, राजू शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेला दिले निवेदन
वाशीमध्ये सुरु असलेल्या उपोषण स्थळाला महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक तथा नगररचनाकार सोमनाथ केकाण यांनी भेट दिली व आयुक्तांच्यावतीने निवेदन स्विकारले. महानगरपालिकेने अडीच दशकानंतर प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. आराखड्यामधील तांत्रीक बाजू समजून घेण्यासाठी नागरिकांना वेळ मिळणे आवश्यक असून सूचना व हरकतीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.