मुलाच्या मृत्यूप्रकरणी उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:09 AM2019-04-20T00:09:29+5:302019-04-20T00:09:33+5:30
तुर्भेतील विकी इंगळे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहे.
नवी मुंबई : तुर्भेतील विकी इंगळे या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले आहे. गतमहिन्यात विकीला पालिका रुग्णालयात दाखल केले असता, वेळेवर व योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप. तर या प्रकरणी पालिका आयुक्तांनी दोघा डॉक्टरांचे निलंबन केले असून, याबाबतही त्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.
विकी इंगळे याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी तात्पुरता उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रात्री पुन्हा त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाला. या वेळी त्याला उपचार मिळण्यास चार तासांचा विलंब झाल्याचा तसेच योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप मयत विकीचे वडील राजेंद्र इंगळे यांनी केला आहे, यामुळे त्यांनी रुग्णालयातील संबंधित सर्वच जबाबदार अधिकारी व डॉक्टर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या निष्काळजीमुळे विकीचा मृत्यू झाल्याने या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचीही त्यांची मागणी आहे. या घटनेच्या अनुषंगाने पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी डॉ. शरीफ तडवी व डॉ. प्रभा सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्या बाबतही इंगळे यांनी रुग्णालयातील अधिकारी व जबाबदार सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या पदव्या रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याकरिता इंगळे यांचे कुटुंब शुक्रवारपासून वाशीत उपोषणाला बसले आहेत.