नवी मुंबई : नेरुळमधील दत्तगुरू सोसायटीमधील १३६ कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी वेळेत देत नाही. यामुळे रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक सूरज पाटील यांनी दिला आहे.नवी मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींमध्ये नेरुळ सेक्टर ६मधील दत्तगुरू सोसायटीचा समावेश आहे. इमारतीचे जिने, छताचे प्लास्टर वारंवार पडू लागले आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. इमारतीच्या पुनर्बांधणीला परवानगी मिळावी, यासाठी रहिवासी अनेक वर्षांपासून सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु अद्याप परवानगी दिली जात नाही. वाढीव चटईक्षेत्र देण्यासाठी या परिसरामध्ये पालिकेने बांधलेल्या मंडईचा अडसर येऊ लागला आहे. पालिका प्रशासन बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी या प्रश्नाचे पडसाद सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सूरज पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. किती दिवस रहिवाशांना पालिकेच्या पायºया झिजविण्यास लावले जाणार आहे. आता सहनशीलतेचा अंत होत असून, ७ दिवसांमध्ये पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनीही पुनर्बांधणीचे प्रस्ताव रखडविले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांची स्थिती गंभीर आहे. कोणत्याही क्षणी इमारती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.
दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 2:35 AM