नवी मुंबई : रिव्हर्स येणाऱ्या ट्रकची धडक लागून दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले असता पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी दोन्ही ट्रक चालकांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ट्रक टर्मिनल बंद झाल्यापासून एपीएमसी आवारात जागोजागी रस्त्यालगत ट्रक उभे केले जात आहेत. तर ट्रक चालकांकडून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करून ट्रक पळवले जात आहेत. परंतु वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने रस्त्यांचे वाहनतळ बनले आहे. यामुळे अनेकदा अपघात घडले असून बुधवारी देखील एकाचे प्राण गेले असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
सानपाडा परिसरात राहणारे धीरज निवडुंगे (२३) व ऋतिक ठाकूर (२३) हे बुधवारी दुपारी दुचाकीवरून एपीएमसी परिसरात आले होते. पुनीत कॉर्नर लगतच्या रस्त्याने ते जात असताना रिव्हर्स घेऊन रस्त्यालगत उभा केला जात असलेल्या ट्रकला त्यांची धडक लागली. यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले असता, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातानंतर दोन्ही ट्रक चालकांनी तिथून पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता धीरज निवडुंगे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर ऋतिक याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर मृत धीरजचे वडील दशरत निवडुंगे यांच्या तक्रारीवरून दोन्ही ट्रक चालकांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.