सूर्यकांत वाघमारे - नवी मुंबई : पिस्तूल बनावट म्हटल्याने जमिनीवर गोळी झाडणाऱ्या तरुणाला कोपरखैरणे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. घटनेच्या वेळी तो काही नातेवाइकांच्याच हत्येच्या तयारीत होता. तत्पूर्वीच झालेल्या अपघातामध्ये त्याचा राग अनावर झाल्याने त्याच ठिकाणी जमिनीवर गोळीबार करून त्याने पळ काढला . रुपेश कुरकेरा (३५) असे त्याचे नाव असून, तो कोपरखैरणे सेक्टर २ येथे राहणारा आहे. घटनेच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत पिस्तूल घेऊन एका नातेवाइकाच्या हत्येच्या उद्देशाने चालला होता, अशी माहिती पुढे आली आहे. तत्पूर्वी त्याचा किरकोळ अपघात झाल्याने वादावादीत त्याचा संताप अनावर झाल्याने घटनास्थळीच त्याने जमिनीवर गोळी झाडली होती. त्यामुळे हा अपघात घडला नसता तर हत्येचा रचलेला कट यशस्वी झाला असता. रुपेशचे वडील अरुण यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांची वाशीतील एका बारमध्ये भागीदारी होती. परंतु काही नातेवाइकांनी फसविल्यामुळे भागीदारी गमवावी लागून, वाईट दिवस आल्याचे वाटत होते. यामुळे वडिलांना फसविणाऱ्या नातेवाइकाचा काटा काढण्याच्या उद्देशाने तो उत्तर प्रदेशमधून पिस्तूल घेऊन आला होता. त्यानुसार घटनेच्या दिवशी तो वडिलांची भागीदारी होती त्या हॉटेलमध्ये दारू पिऊन कोपरखैरणेत नातेवाइकांच्या घराच्या दिशेने जात असतानाच त्याचा अपघात झाला. त्याने चार वर्षांपूर्वी दारूच्या नशेत हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी त्याला अटक झाली होती.
गुरुवारी केली अटककोपरखैरणे येथे जमिनीवर गोळी झाडून एकाने पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्याच्या शोधासाठी पथके तयार केली होती. अखेर गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली.