विघ्नहर्त्याच्या आगमन मिरवणुकीत राड्याचा श्रीगणेशा, तिघांवर जीवघेणा हल्ला

By सूर्यकांत वाघमारे | Published: September 13, 2023 07:43 PM2023-09-13T19:43:18+5:302023-09-13T19:43:38+5:30

कोपर खैरणेतली घटना : जुन्या वादातून घडली घटना

fatal attack on three in Lord Ganesha rally | विघ्नहर्त्याच्या आगमन मिरवणुकीत राड्याचा श्रीगणेशा, तिघांवर जीवघेणा हल्ला

विघ्नहर्त्याच्या आगमन मिरवणुकीत राड्याचा श्रीगणेशा, तिघांवर जीवघेणा हल्ला

googlenewsNext

नवी मुंबई : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिस झटत असतानाच श्रीगणेशाच्या आगमनाच्या मिरवणुकीतच बँड पथक व मिरवणुकीत सहभागी झालेले यांच्यात वाद होऊन जबर मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये दोघेजण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोपर खैरणे सेक्टर ५ ते ८ दरम्यानच्या मैदानात स्थापना होणाऱ्या कोपर खैरणेचा राजा मंडळाच्या श्रीगणेशाच्या आगमन मिरवणुकीत रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. मंडळाच्या ठिकाणापासून काही अंतरावर मिरवणूक आली असता मिरवणुकीत सहभागी झालेल्या विजय कचरे याचा वन साईड बँड पथकाच्या सूरज धनावडे याच्यासोबत वाद सुरु होता. त्यांच्या वादात तेजस सणस हा पडला असता सूरज व त्याच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून त्याला मारहाण केली. बॅण्डमध्ये वाजवायच्या थाळ्यांसह इतर लोखंडी साहित्यांनी व लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण सुरु होती. त्याचवेळी प्रणव सावळे याने त्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. यामुळे अर्ध्या तासाने त्याला देखील बँड पथकाच्या तरुणांनी जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाल्याने त्यांना वाशीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बाबू उर्फ सूरज धनावडे, रोशन धनावडे, अमोल पार्टे, पप्पू पवार व गणेश शिंदे यांच्यावर सोमवारी रात्री कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सूरज धनावडे याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असून तो वनसाईड मंडळाचा प्रमुख आहे. तर तेजस व त्यांच्यात यापूर्वीच वाद असल्याने आगमन मिरवणुकीत एकमेकांना ठस्सन देण्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला असता त्यातून हा प्रकार घडला. दरम्यान नवी मुंबईत गणेशोत्सवाला या घटनेमुळे गालबोट लागला आहे. तर या घटनेवरून मंडळांच्या आडून पसरवली जाणारी दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे.

Web Title: fatal attack on three in Lord Ganesha rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.