प्राची सोनवणे, नवी मुंबई
वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हार्बर तसेच ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर या वर्षअखेरपर्यंत झालेल्या विविध अपघातांत १९२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त असून, वाढत्या गर्दीमुळे गाडीतून पडून जीव गमवावा लागणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही लोकल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकरिता मात्र मृत्यूचा सापळा ठरत आहे. वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हार्बर मार्गावरील गोवंडी-मानखुर्द ते सीवूड्स तसेच ट्रान्स हार्बरमार्गावरील ऐरोली ते सानपाडा-जुईनगर या रेल्वेमार्गाचा समावेश होतो. हार्बर मार्गासह ठाणे-वाशी- पनवेल हा ट्रान्स हार्बर मार्ग नवी मुंबईशी जोडला गेल्याने या दोन्ही रेल्वेमार्गांवरून नवी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता यामध्ये गाड्यांची संख्या अजूनही वाढविली नसल्याने या मर्गावरील प्रवाशांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो आणि यामुळेही अनेक अपघात घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकलमधून पडून मृत पावणाऱ्यांची तसेच जखमींची संख्याही वाढली आहे. या वर्षभरात १९३ प्रवासी जखमी झाले असून, निव्वळ जखमी झालेल्यांची संख्या एकूण १५७ आहे. याध्ये २५ प्रवासी रूळ ओलांडताना जखमी झाले आहेत, तर ९३ प्रवासी लोकलच्या डब्यामधून पडून जखमी झाले आहेत. ४९ प्रवासी अन्य कारणाने जखमी झाल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम मरभळ यांनी दिली. या मार्गावर सर्वाधिक अपघात गोवंडी-मानखुर्द, सानपाडा-तुर्भे, नेरूळ, घणसोली आदी रेल्वे स्थानकांजवळ रूळ ओलांडताना झाल्याचे आणि गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ज्या रेल्वे स्टेशनलगत रेल्वे ट्रॅक ओलांडला जातो, किमान त्या ठिकाणी तरी रेल्वे अथवा सिडको व्यवस्थापनाने पादचारी पूल उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. तुर्भे नाका, सानपाडा दत्त मंदिर, बेलापूर खिंड, एरोली या परिसरातही रेल्वे अपघातांची संख्या वाढत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून जनजागृती केली जाते. वर्षभरात १०९ प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडताना जीव गमावला आहे. ७२ प्रवाशांचा रेल्वेरूळ ओलांडताना आणि ११ प्रवाशांना गाडीतून पडून जीव गमवावा लागला आहे. - नितीन बोबडे, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, वाशी