कामोठेवासीयांचा जीवघेणा प्रवास
By admin | Published: July 3, 2017 06:46 AM2017-07-03T06:46:15+5:302017-07-03T06:46:15+5:30
कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. या ठिकाणच्या अपघातांमध्ये सुमारे २० जणांनी प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो जखमी झाले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामोठेवासीयांच्या रोजच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पनवेल-शीव महामार्ग सोमवारी रोखण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलन टळावे यासाठी नवी मुंबई पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेकापच्या नेत्यांशी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली; परंतु कामोठे येथील शेकापचे कार्यकर्ते मोर्चावर ठाम आहेत. कामोठेवासीयांना वसाहतीमधून पनवेल-सायन महामार्ग गाठण्यासाठी दररोज दोन किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागतो. अवघ्या पन्नास मीटर रस्त्याचे काम बांधकाम विभागाने न केल्यामुळे हा घोळ झाला आहे.
कामोठेवासीयांच्या या रोजच्या समस्येसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने ३ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन शेकापच्या शिष्टमंडळासोबत शनिवारी सकाळी कामोठे पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम सध्या मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी थांबले असून, ही मंजुरी आल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, त्यानंतर निविदा पक्रिया पार पडण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागेल, त्यानंतर पुढील काम सुरू होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता अलगुट यांनी दिले. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कामोठेतील सर्व्हिस रोडचे रखडलेले काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
५० मीटरचे काम अपूर्ण
साडेबाराशे कोटी रूपयांचा मार्ग बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वांवर बांधला. मात्र, यामधील अवघ्या पन्नास मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण न केल्यामुळे कामोठेवासीयांना कळंबोलीतील उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन मुंबईचा महामार्ग गाठावा लागतो.