नवी मुंबई : रुग्णवाहिका चालकाच्या हत्येप्रकरणी नेरुळ पोलिसांनी तिघा पिता पुत्रांना अटक केली आहे. त्यांचा भुर्जी पावचा व्यवसाय असून त्यांनी नारळाची केलेली चोरी युवराज सिंह (३०) याने उघड केल्याने त्याची हत्या केली होती. याप्रकरणी इतर एकाचा पोलिस शोध घेत असून सर्वजण मानखुर्दचे राहणारे आहेत.
नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयाबाहेर रविवारी रात्री हि घटना घडली होती. रुग्णवाहिकेवर चालक तसेच मदतनीसचे काम करणाऱ्या युवराज सिंह याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. रुग्णालयाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांपैकी भुर्जी पाव विक्रेता व त्याचा मित्र तिथल्याच नारळ पाणी विक्रेत्याच्या नारळांची चोरी करत होते. याचे फोटो युवराज याने मोबाईलने काढून नारळ विक्रेता मनोज साबणे याला दाखवले होते. त्यामुळे आपली चोरी उघड झाल्याच्या रागात भुर्जी विक्रेत्याने त्याची दोन मुले व इतर एकाच्या मदतीने युवराज याच्यावर हल्ला करून हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सोमवारी रात्री नेरुळ पोलिसांनी अमजद रियाज खान (४५), समीर अमजद खान (२४) व शोएब अमजद खान (२२) यांना अटक केली आहे. ते मानखुर्दचे राहणारे असून नेरूळमध्ये भुर्जी पाव विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेवरून नेरुळ परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना शहरात अभय मिळत असल्याने शहरात राहणारे तसेच शहराबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती देखील पदपथांवर हातगाड्या थाटून बसत आहेत. त्यांच्यात आपसात वादातून देखील हाणामारीच्या घटना घडत आहेत. परंतु प्रशासनाकडून अनधिकृत फेरीवाल्यांची उघड पाठराखण होत असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढताना दिसत आहे.