पोलिसांच्या चकमकीत फैयाज शेख जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 06:11 AM2018-10-21T06:11:57+5:302018-10-21T06:12:03+5:30
राज्याच्या विविध भागांत ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या फैयाज शेखला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
नवी मुंबई : राज्याच्या विविध भागांत ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या फैयाज शेखला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
मागील दीड वर्षापासून तो नवी मुंबई पोलिसांना चकवा देत होता. या दरम्यान दोन वेळा त्याने पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला होता. अखेर खालापूर येथील गावात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो व त्याचा साथीदार पोलिसांच्या हाती लागला आहे.
शुक्रवारी फैयाज आणि त्याचे दोन साथीदार गुन्ह्याच्या उद्देशाने खारघर परिसरात आले होते. त्या ठिकाणी जबरी चोरीचे दोन गुन्हे केल्यानंतर एका कारचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याची कार पळवून नेली होती. त्यानंतर फैयाज हा त्याच्या साथीदारांसोबत खालापूर येथील नढाळ गावामध्ये लपला होता. याची माहिती मिळताच आयुक्त
संजय कुमार, सहआयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, अशोक दुधे, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले
होते. त्यामध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे, शिरीष
पवार, अजयकुमार लांडगे, प्रदीप तिदार, विजय कादबाने, सहायक निरीक्षक राहुल राख, विजय चव्हाण, नीलेश माने, प्रतापराव कदम, उपनिरीक्षक विक्रांत थारकर, योगेश वाघमारे, नितीन शिंदे आदींचा समावेश होता.
पोलिसांनी शनिवारी सकाळी ६.३० वाजता फैयाजच्या साथीदाराच्या सखाराम पवारच्या घराला घेराव घातला; या वेळी सखारामने फैयाजला सतर्क केल्याने त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याने समोरून गोळी लागूनही वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार व विजय कादबाने यांचे प्राण वाचले. अखेर पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या असता, एक गोळी फैयाजच्या पायाला लागल्यानंतरही त्याने साथीदारासह घराच्या खिडकीतून पळ काढला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून फैयाज व त्याचा साथीदार हाजी पिर मोहमद शेख (३१) याला पकडले. त्यांना उपचारासाठी कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. तर फैयाजला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी सखाराम पवारला अटक करण्यात आली आहे.
>दीड वर्षापासून पोलीस मागावर
सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, लूट, हत्येचा प्रयत्न, मकोका असे ९० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार फैयाज शेख याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ गुन्हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील असून, या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दीड वर्षापासून त्याच्या मागावर होते.या दरम्यान तो सतत राहण्याचे ठिकाण बदलून, तसेच वेशभूषा करून पोलिसांना चकवा देत होता. त्यानंतरही तीनदा पोलिसांनी त्याला घेरले होते. या दरम्यान गुजरात व वसई येथे त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करून पळ काढला होता. त्यानंतर आता केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली.