एफडीएची नवी मुंबई महापे येथे कारवाई २७ लाखांहून अधिक किमतींचा अन्न पदार्थांचा साठा जप्त
By स्नेहा मोरे | Published: November 12, 2022 01:51 PM2022-11-12T13:51:41+5:302022-11-12T13:52:01+5:30
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे व असते.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे व असते.
दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह "खाद्यतेल" व "पावडर मसाले" यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
10 नोव्हेंबर 2022 रोजी मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई या ,"उत्पादक" अन्न आस्थापनातून हळद पावडर (वजन 296 किलो), धनिया पावडर (वजन 3998 किलो), मिरची पावडर (वजन 6498 किलो), जीरे पाउडर (वजन 5454 किलो) तसेच करी पाउडर (वजन 2498 किलो) असा एकूण रुपये 27,39,000/-- एवढ्या किमतीचा अन्नपदार्थाचा साठा तो गैरछापाचा व कमी प्रतीचा असल्याचा संशयावरून जप्त करण्यात आला.
सदर अन्न आस्थापनातून एकूण ०५ अन्नपदार्थांचे नमुने अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आलेल्या असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच त्या अनुषंगाने उचित कायदेशीर कारवाई घेण्यात येईल.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे कॅबिनेट मंत्री श्री. संजयजी राठोड यांचे आदेश व श्री अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सदर कार्यवाही श्री. राहुल ताकाटे, अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे यांनी श्री. अशोक पारधी, सहाय्यक आयुक्त (अन्न), ठाणे यांचे उपस्थितीत केलेली आहे.
जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासह अन्नविषबाधे सारखी अप्रिय घटना घडू नये म्हणून प्रशासनामार्फत नियमितपणे अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे घेण्यात येणार आहेत.
"खाद्यतेल उत्पादक" यानी खाद्यतेलाचे पैकिंग करने कामी एकदा उपयोग आणलेल्या टिनांच्या डब्यांचा खाद्यतेलाच्या पॅकिंग करण्यासाठी पुनर्वापर करू नये, कोणत्याही खाद्यतेलाचे पॅकिंग करताना विहित दर्जाच्या बी. आय. एस. ग्रेडच्याच टीनाच्या डब्यांचा उपयोग करावा, खाद्यतेलाच्या सर्वांगीण व सर्वकश तपासणी व विश्लेषणासाठी स्वतःची अद्यावत इन हाऊस (अंतर्गत) प्रयोगशाळा ठेवावी. कोणत्याही खाद्यतेलाची लूज, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरूपात विक्री करू नये. अन्नपदार्थ हाताळणीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक कामगारांचे ते संसर्गजन्य रोग आणि किंवा त्वचारोग यापासून मुक्त आहेत याची खात्री व खातर जमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. "मिठाई" या अन्नपदार्थाच्या किरकोळ विक्रेत्यांनी सुट्ट्या स्वरूपातील मिठाईच्या ट्रेवर सदर मिठाई कोणत्या तारखेपर्यंत वापरावी याबाबतचा स्पष्ट उल्लेख नेहमी करावा.
प्रत्येक उत्पादकाने उत्पादन प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व्यक्तीची नेमणूक करावी. तसेच अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विहित केल्याप्रमाणे प्रत्येकी 25 कामगारामागे एका व्यक्तीला अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत फास्टट्रॅक ट्रेनिंग प्राप्त करून घ्यावे. जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून खाद्यतेला व्यतिरिक्त इतर उत्पादकांनी त्यांनी विक्रीसाठी उत्पादित केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थाचे बॅच निहाय तपासणी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या एन. ए. बी. एल. प्रयोगशाळेकडून तपासणी करून घ्यावी.
प्रत्येक अन्न व्यवसाय चालकाने बिलावर अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत त्याला मंजूर करण्यात आलेला परवान्याचा क्रमांक न चुकता नमूद करावा तसेच सदरचा परवाना सर्वांना दिसेल अशा ठिकाणी फोटो फ्रेम करून लावावा. उत्पादक,आयातदार, वितरक यांनी कोणत्याही अन्नपदार्थाची विनापरवाना किंवा विनानोंदणी अन्न आस्थापकडून खरेदी करू नये किंवा विनानोंदणी किंवा विनापरवाना अन्न आस्थापनांना कोणत्याही अन्नपदार्थाची कोणत्याही परिस्थितीत विक्री करू नये. प्रत्येक अन्न व्यवसायाचालकाने त्याच्या दुकानात व परिसरात अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचा परवाना व नोंदणी) २०११ अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे सर्वसाधारण स्वच्छता राखावी असे नम्र आवाहन श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न) कोकण विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, ठाणे यांनी जनहित व जन आरोग्य विचारात घेता केलेली आहे.
कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक व गरजेचा असल्याने कोणत्याही अन्नपदार्थाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत आणि किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर नोंदवावी असे आवाहन श्री सुरेश देशमुख, सह आयुक्त (अन्न), कोकण विभाग, ठाणे यांनी जनतेस केलेले आहे.