पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित ४४ सुरक्षारक्षकांना सिडकोने घरे रिकामे न केल्याचे कारण पुढे करीत, कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोत सेवेत असताना संस्थेच्या धोरणाविरोधात भूमिका घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाई नंतर दहा गावांतील प्रकल्पग्रस्त आक्र मक झाले आहेत. कारवाईचा निषेध केला असून, सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सुरक्षारक्षकांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी ओवळे येथे बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीमध्ये सर्वांनीच सिडकोच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. सिडकोने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. पुनर्वसनाच्या पॅकजेसची पूर्तता विनाविलंब करावी. २२ टक्के विकसित भूखंड तत्काळ द्यावेत. घरे रिकामे करण्यासाठी ठरवलेला भत्ता द्यावा व ४४ सुरक्षारक्षकांना तत्काळ कामावर घ्यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. सिडकोने केलेल्या कृत्याच्या निषेधार्थ दहा गावांतील प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.सुरक्षारक्षकांवर कारवाई करणे, हे हुकूमशाही वृत्तीचे लक्षण आहे. आम्हाला विरोध केल्यास आम्ही तो मोडीत काढू, हेच या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पग्रस्त सिडकोच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले.सुरक्षारक्षकांवर कारवाई करणारे दक्षता अधिकारी विनय कोरगावकर आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पुनर्वसनाचे दिलेले आश्वासन पाळावे, या तीन मागण्यांसाठी येथील दहा गावांतील प्रकल्पग्रस्त पुन्हा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. येथील प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यात भूखंड अद्याप देण्यात आलेले नाहीत. घरांच्या बदल्यात मिळणारी रक्कम, ज्या क्षेत्रात भूखंड देणार आहेत, त्या ठिकाणी प्राथमिक सुविधांचा वानवा आहे, अशा वेळी सिडकोने स्वत:ची पुनर्वसनाची जबाबदारी पूर्ण न करता, दडपशाहीने घरे खाली करण्यास भाग पाडले असता, त्याला विरोध करणाºया सुरक्षारक्षकांना कामावरून काढून टाकणे, ही सिडकोची दडपशाही असल्याचे या वेळी बैठकीत सांगण्यात आले. दहा गाव विमानतळग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी २१ दिवसांचे अल्टिमेटम सिडकोला दिले आहे. तीन मागण्या सिडकोपुढे ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांची पूर्तता न केल्यास विमानतळाचे काम बंद पाडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या बैठकीला आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, लॉरीमालक-चालक संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, रायगड जिल्हा परिषद सदस्य रवि पाटील, अविनाश सुतार, निशांत भगत, डी. के. कोळी, ओवले ग्रामपंचायतीच्या सरपंच अनिता पाटील, माजी सरपंच महिंद्र पाटील, नरेश घरत, प्रमोद ठाकूर आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.सुरक्षारक्षक मंडळाचे सिडकोला पत्रसिडकोने दि. २४ रोजी ४४ सुरक्षारक्षकांना सुरक्षा मंडळात परत पाठविण्याचे जो तडकाफडकी निर्णय घेतला आहे, तो नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या विरोधात आहे. यामुळे ४४ सुरक्षारक्षकांच्या कुटुंबीयांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.सुरक्षारक्षकांना आस्थापनातून कमी करण्याकरिता कमीत कमी एक महिन्याची नोटीस देणे बंधनकारक असावे, असे पत्र ब्रहन्मुंबई व ठाणे सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी दि. २४ रोजी सिडकोला पत्राद्वारे कळविले आहे.सिडकोने दिलेली पुनर्वसनाची आश्वासने पाळावीत. जोपर्यंत सिडको दिलेली आश्वासने पाळत नाही, तोपर्यंत मी माझे घर रिकामे करणार नाही.- अनिल पाटीलसिडकोने तत्काळ सुरक्षारक्षकांना सेवेत घ्यावे. पुनर्वसनाची दिलेली आश्वासने पाळावीत, तसेच दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, याकरिता आम्ही २१ दिवसांची मुदत देत आहोत. ही आश्वासने न पाळल्यास संपूर्ण आगरी कोळी समाज रस्त्यावर उतरून विमानतळाचे काम बंद पाडेल.- नीलेश पाटील, अध्यक्ष, आगरी कोळी युथ फाउंडेशनसिडकोला जर या ठिकाणाहून विमान उडवायचे असल्यास प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा आम्हाला या ठिकाणचे काम बंद पाडावे लागेल. आमच्या मागण्या मान्य न केल्यास सिडको विरोधात पुन्हा मोठा लढा उभारावा लागेल.- नंदराज मुंगाजी,अध्यक्ष लॉरीचालक-मालक संघटना
सिडको विरोधात विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:32 AM