मजुरांच्या मुलांची शिक्षणासाठी फरफट
By Admin | Published: November 14, 2015 02:27 AM2015-11-14T02:27:20+5:302015-11-14T02:27:20+5:30
स्वत: झोपडीत राहून लोकांच्या स्वप्नातील घरांच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या मुलांना आजही शिक्षणासाठी झगडावे लागत आहे.
प्राची सोनवणे, नवी मुंबई
स्वत: झोपडीत राहून लोकांच्या स्वप्नातील घरांच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुरांच्या मुलांना आजही शिक्षणासाठी झगडावे लागत आहे. शहरात एकीकडे टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना इमारतीचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या मुलांची अवस्था मात्र अत्यंत वाईट
आहे. शहरातील सर्वच बांधकाम कामगार, नाका कामगारांची नोंदणी आजवर झालेली नसून नोंदणी न झालेल्या कामगारांच्या मुलांना शैक्षणिक मदतीसाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नसल्याने या मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे
लागते.
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने ४ जुलै रोजी करण्यात आलेल्या शाळाबाह्य बालक सर्वेक्षणामध्ये एकूण १०९७ बालके शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण भागातील शाळाबाह्य मुलांच्या तपासणीत ५२७७ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले.
सिमेंट, मातीच्या ढिगाऱ्यावर भरते शाळा
नवी मुंबईतील सुप्रभा रावराणे या उच्चशिक्षित मुलीने आपल्या पदवीचा वापर पैसे मिळविण्यासाठी न करता शिक्षणापासून वंचित असलेल्या मजुरांच्या मुलांना तिच्या शिक्षणाचा फायदा कसा करता येईल यासाठी ती प्रयत्न करते. नवी मुंबईतील सर्व बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या मुलांना सुशिक्षित करण्यासाठी ती स्वत: त्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना लिहिता - वाचता यासाठी जीवापाड मेहनत घेते. यासाठी तिला पालकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मुलाला शाळेत पाठविण्यासाठी पुरेसा पैसा नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या इमारती बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करावी लागते. या अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करायचे अशी व्यथा या मजुरांनी मांडली. सिमेंट, वाळू, माती यांच्या ढिगाऱ्यावर भरणारी या मुलांची ही शाळा प्रत्येकाचे डोळे पाणावणारी आहे. या मुलांशी चर्चा केल्यावर आम्हाला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि अशा उंच उंच इमारतीमध्ये आमचं स्वत:चं घर घ्यायचं असे निरागस उत्तर या मुलांनी दिले.
नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर ८ व १५, वाशी, पामबीच मार्ग, सानपाडा अशा अनेक ठिकाणी असलेल्या बांधकाम क्षेत्रात जाऊन तिथल्या मुलांना एकत्र गोळा करून मुळाक्षरे, कविता, गाणी, आकडेमोड शिकविली जाते. या लोकांमध्ये जनजागृती केल्याने एका वर्षाहून अधिक कालावधीपर्यंत सुरू राहणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील मजुरांची ७० टक्के मुले आज महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती सुप्रभा हिने दिली.