खोक्यांमुळे आग लागण्याची भीती
By admin | Published: May 6, 2016 12:33 AM2016-05-06T00:33:55+5:302016-05-06T00:33:55+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारामध्ये अनधिकृत खोकी व बॉक्स विके्रत्यांचे प्रमाण वाढत आहे. मोकळ्या जागेसह मार्केटबाहेरील रोडवरही अतिक्रमण केले आहे. कामगार विड्या व सिगारेट ओढत असल्याचे चित्र पहावयास मिळत असून, त्यामुळे मार्केटला आग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला की मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त होते. अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीय कामगार, अनधिकृत खोके विक्रेते बिनधास्तपणे येथे वावरत असतात. रोज तब्बल ४०० ते ४५0 वाहनांमधून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. या आंब्यांच्या पॅकिंगसाठी मार्केटमध्ये अनेक ठिकाणी लाकडाची खोकी तयार करण्याचा व्यवसाय सुरू झाला आहे. १० ते १५ फूट उंच खोक्यांचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. मार्केटमधील जागा कमी पडू लागल्यामुळे आता तुर्भे ते सीडब्ल्यूसी गोडावूनकडे जाणाऱ्या रोडवरही खोकी ठेवली जात आहेत. मार्केटमध्ये काम करणारे बहुतांश परप्रांतीय कामगार धूम्रपान करतात. विड्या व सिगारेट ओढून ती तेथील गवत व लाकडावरच टाकले जाते. यामुळे आग लागून पूर्ण मार्केट जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकणसह कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातवरून आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत आहे. येथे हजारो कामगार काम करत आहेत. दिवाळीत मसाला मार्केटमध्ये आग लागली होती. त्याप्रमाणे फळ बाजारामध्येही आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून मुंबई एपीएमसीची ओळख आहे. परंतु या मार्केटमध्ये कुठेच आग विझविण्याची यंत्रणा नाही. फळ मार्केटमध्ये आंबा हंगामामध्ये आग लागली तर अग्निशमन विभागाची गाडी जाण्यासही जागा नाही. मार्केटमध्ये सर्वत्र गवताचे व खोक्यांचे ढिगारे असल्याने पूर्ण मार्केट जळून खाक होवू शकते. अग्निशमन विभागाने यापूर्वीही बाजार समितीला वारंवार नोटीस दिली आहे. परंतु व्यापारी व प्रशासन सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेचेही अभय
खोके विक्रेत्यांनी फळ मार्केटच्या बाहेर रोडवरही दुकाने थाटली आहेत. दोन मार्गिका विक्रेत्यांनी अडविल्या असून वाहतुकीसाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन संबंधितांवर कडक कारवाई करत नसल्याने पालिकेच्या आशीर्वादानेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.