कळंबोली : कळंबोली पोलीस स्टेशन आवारात सिडकोने चाळीस वर्षांपूर्वी सुरुची झाडे लावली आहेत. सद्यस्थितीमध्ये यामधील काही वृक्ष धोकादायक झाली असून पोलीस स्टेशनच्या इमारतीकडे कलली आहेत. कोणत्याही क्षणी वृक्ष कोसळण्याची शक्यता असून याविषयी महापालिकेला कळवूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
पोलीस स्टेशनसमोरील काही झाडे अतिधोकादायक झाली आहेत. या झाडाच्या फांद्या पोलीस ठाण्याच्या इमारतीवर आल्या आहेत. पावसाळा सुरू झाल्याने सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर झाडे कोणत्याही क्षणी पडू शकतात. नागरिक झाडाखालून पोलीस ठाण्यात ये -जा करतात. त्याचबरोबर गोपनीय विभागाच्या इमारतीवरही हे जुने झाड पडण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी एखादी घटना घडली तर याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनतेचे रक्षण करणारेच आपला जीव मुठीत घेवून या ठिकाणी काम करीत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी महापालिका, सिडकोकडे दाद मागून पोलीस सुद्धा थकले आहेत. परंतु संबंधित प्रशासकीय यंत्रणाच्या गलथान कारभारामुळे दुर्लक्ष केले जात आहे.गतवर्षी करवली नाका येथे पावसाळ्यात दुचाकीवर झाड उन्मळून पडले होते. वित्तहानी झाली. सुदैवाने जीवित हानी झाली नव्हती. पावसाळ्याअगोदर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत सिडको व महापालिकेने या संदर्भातील उपाययोजना करण्यास हव्या होत्या तसे काही घडले नाही. झाडांची फांद्या छाटणी करावी यासाठी पोलिसांकडून पत्राद्वारे मागणी केली आहे.पोलीस ठाणे येथील सुरु ची असलेली झाडे चाळीस वर्षांपूर्वीची आहे आणि ती कमकुवत झाली असून झाडांच्या फांद्या इमारतीवर आल्या आहेत. ही झाडे झुकलेल्या अवस्थेत असल्याने ते कधीही इमारतीवर कोसळू शकतात. या संदर्भात आम्ही महापालिका, सिडकोशी पत्रव्यवहार केला असता कोणतीही कार्यवाही होत नाही.- सतीश गायकवाड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोलीकळंबोली पोलीस ठाणे आवारात असलेली सुरुची झाडे कमकुवत झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. गतवर्षी महापालिकेने या झाडांची छाटणी केली होती. यंदाही तशीच परिस्थिती असेल तर पाहणी करून झाडांची छाटणी केली जाईल.- तेजस्विनी गलांडे, सहायक आयुक्त,पनवेल महापालिका