नवी मुंबई : घणसोलीमधील सेंट्रल पार्कमध्ये महापालिकेने स्केटिंग रिंग, फुटबॉल टर्फ, क्रिकेट सराव पीच व अॅम्पी थिएटर या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांच्या वापरासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याविषयी प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये चांगली उद्याने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरुळमध्ये वंडर्स पार्क, संत गाडगेबाबा उद्यान व इतर चांगली उद्याने तयार केली आहेत. घणसोली परिसरामध्ये सेंट्रल पार्क विकसित करण्यात आले आहे. उद्यानाचे काम पूर्ण झाले असून तेथील प्रकल्पग्रस्तांच्या घरांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे उद्घाटन रखडले आहे. जवळपास ३८ एकर क्षेत्रफळावर हे उद्यान उभारण्यात आले आहे. त्यामध्ये आकर्षक मानवी पुतळ्यांसह स्केटिंग रिंग, फुटबॉल टर्फ, क्रिकेट सराव पीच व अॅम्पी थिएटर ही सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. उद्यानाच्या देखभालीवरही महिन्याला लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. खर्चाचा भुर्दंड प्रशासनावर येऊ नये, यासाठी येथील सुविधांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने यासाठी प्रस्ताव तयार करून जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील सर्व सुविधा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत असणार आहेत. खासगी शाळा, क्लब, कार्पोरेट कंपनी यांच्यासाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रातील मराठी चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणासाठी सकाळी ६ ते सायंकाळी ५ दरम्यान सहा ते आठ हजार रुपये, अमराठी चित्रीकरणासाठी आठ ते दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. मनपा क्षेत्राबाहेरील मराठी चित्रीकरणासाठी आठ ते १२ हजार रुपये व अमराठीसाठी १२ ते १४ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
तरण तलावासह स्केटिंग रिंगसाठी शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:48 AM