नामदेव मोरे नवी मुंबई : प्रत्येक सूर्योदय पाहिला की आम्हाला पुनर्जन्म झाल्याचा भास होत आहे. घराचे प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. प्लॅस्टरसह इमारती कधीही कोसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुनर्बांधणीचा प्रश्न रखडल्यामुळे व संक्रमण शिबिराची सोय नसल्यामुळे दोन लाख रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
वाशी सेक्टर २६ मध्ये राहणाºया चिंतामणी सोसायटीतील भगवान दिलपाक यांच्या घरातील स्लॅबचा काही भाग बुधवारी कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. नवी मुंबईमध्ये स्लॅबचा भाग कोसळण्याची ही पहिली घटना नाही. प्रत्येक आठवड्यात किमान एकतरी ठिकाणी स्लॅबचा काही भाग कोसळत आहे. दहा वर्षांमध्ये १०० पेक्षा जास्त घटना घडल्या असून यामध्ये एक महिलेचा मृत्यू व अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील धोकादायक इमारतींचा व पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरातील ४४३ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यामधील ५५ इमारती अतिधोकादायक असून, त्या तत्काळ खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे; परंतु यानंतरही बहुतांश इमारतींचा वापर सुरूच आहे. सिडकोने बांधलेल्या इमारतींचे प्लॅस्टर वांरवार कोसळू लागले आहे. शासनाने जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ४ फेब्रुवारी २०१५ मध्ये अडीच एफएसआय मंजूर केला आहे. यानंतर पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागेल असे बोलले जात होते. चार वर्षांमध्ये २३ गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्बांधणीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत; परंतु यामधील एकही प्रस्तावास बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही.धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी महापालिकेकडून परवानगी मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी अरुंद रस्ता, काही ठिकाणी फ्लेमिंगो प्रभावीत क्षेत्राचे नवीन नियम व काही ठिकाणी रहिवाशांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे पुनर्बांधणी रखडली आहे. या सर्वांचा फटका शहरातील पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या धोकादायक इमारतीमधील रहिवशांना बसू लागला आहे. नेरुळ सेक्टर २४ मधील सिडकोच्या इमारतींमध्ये वारंवार स्लॅबचा भाग कोसळत असतो. येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. रोजचा सूर्योदय आम्हाला पुनर्जन्म झाल्याचा अनुभव देत असल्याची प्रतिक्रिया काही रहिवाशांनी व्यक्त केली आहे. घरातील स्लॅबचा भाग कधी कोसळेल याची खात्री नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा -बटाटा मार्केटचीही स्थिती अशीच असून येथील कामगार, व्यापारीही जीव मुठीत घेऊन नोकरी, व्यवसाय करत आहेत.धोकादायक इमारतीत एक बळीधोकादायक इमारतीमधील सदनिकेच्या छताचे प्लॅस्टर कोसळून आतापर्यंत अनेक जण गंभीर जखमी झाले असून, एक महिलेचा मृत्यू झाला आहे. नेरुळ सेक्टर ६ मधील एव्हरग्रीन सोसायटीमध्ये १६ जुलै २०१७ रोजी एक सदनिकेमध्ये छताचे प्लॅस्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे बनुबाई लोंढे या महिलेचा मृत्यू झाला आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.इमारतींचा स्लॅब कोसळल्याच्या घटना१२ जून २०१८ - वाशी सेक्टर ९ मधील जेएन २ टाइप इमारतीमधील दीपाली कुंभारकर यांच्या घरातील स्लॅबचा भाग कोसळला, सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.४ जुलै २०१८ - सानपाडा सेक्टर ३ मधील कृष्णा साळुंखे व सीवूड सेक्टर ४८ मधील अन्नपूर्णा सोसाटीमधील चव्हाण कुटुंबीयांच्या घरामध्ये स्लॅबचा भाग कोसळला.३१ जुलै २०१८ - ऐरोली सेक्टर ३ मध्ये आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांच्या घरामध्ये छताचे प्लॅस्टर कोसळले.१६ आॅगस्ट २०१८ - सीवूड सेक्टर ४८ मधील साई संगम सोसायटीमधील समीर नार्वेकर यांच्या घराचे प्लॅस्टर कोसळले व समीर यांची आई व बहीण गंभीर जखमी झाले.२८ फेब्रुवारी २०१९ - नेरुळ सेक्टर २४ मधील स्वागत सोसाटीमधील अनिता होमने यांच्या घरातील स्लॅबचा भाग कोसळला. या परिसरात चार सोसायटीमध्ये अशाप्रकारच्या १५ घटना आतापर्यंत घडल्या आहेत.नेरुळ सेक्टर २४ मधील स्वागत व इतर गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्लॅस्टर कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. जीव मुठीत घेऊन सर्वांना राहावे लागत असून प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.- शैलेश जाधव, रहिवासी, नेरुळ, सेक्टर-२४सेक्टर २६, कोपरी परिसरातील चिंतामणी सोसायटीत राहणाºया भगवान दिलपाक यांच्या घरातील छताचे प्लॅस्टर कोसळले. यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे.- विलास भोईर,नगरसेवक,शिवसेनाधोकादायक इमारती ४४३अतिधोकादायक : ५५दुरुस्तीयोग्य ३३२वापर सुरू असलेल्या इमारती - ३७३धोकादायक इमारतीतील रहिवासी - २ लाख