कळंबोली - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. पनवेलमधील काही खासगी शाळेकडून आॅगस्ट महिन्यापासून १ली ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. आॅगस्ट महिना संपत आल्याने, पालकांकडे चक्क जूनपासूनच्या फीसाठी तगादा लावला जात आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची मागणी पालकांनी केली आहे.पनवेल तालुक्यात मराठी व इंग्रजी माध्यमाच्या २९६ खासगी शाळा आहेत. मार्च-एप्रिल महिन्यातील परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला. शिक्षण विभागांकडून विद्यार्थ्यांचे २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, म्हणून जूनपासून आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी शाळांना सांगण्यात आले. त्यानुसार, पनवेल परिसरातील काही शाळेकडून जून महिन्यात तर काही शाळेकडून आॅगस्ट महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. आॅगस्ट महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून चक्क जूनपासूनच्या फीची सक्ती करण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्यात शाळेकडून आॅनलाइन क्लासेस सुरू नसताना फी कसली घेता, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.लॉकडाऊन काळातील फी शाळेने आकारू नये, असे शिक्षण विभागांकडून आदेश देण्यात आले आहे, तरी आॅनलाइनच्या नावाखाली पालकांना दोन महिन्यांच्या फीसाठी तगादा लावला जात आहे. तशी पालकांनी गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण विभागांकडून फीसाठी तगादा लावू नये, असे शाळांना पत्र देण्यात आले असल्याचे गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.लॉकडाऊन काळातील फी शाळेने आकारू नये, असे शिक्षण विभागांकडून आदेश देण्यात आले आहे, तरी आॅनलाइनच्या नावाखाली पालकांना दोन महिन्यांच्या फीसाठी तगादा लावला जात आहे.फीमध्ये विविध अॅक्टिव्हिटीचाही समावेशशाळेकडून आॅगस्टमध्ये आॅनलाइन क्लासेस सुरू केले आहे, तर जूनपासूनच्या फीसाठी पालकांना एसएमएस पाठवून फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. आॅनलाइन फीसोबत स्पोर्ट फी अशा विविध अॅक्टिव्हिटी फीचा समावेश करून शुल्क भरण्यास पालकांना सांगितले जात आहे. शाळा सुरू नाहीत, मग विविध अॅक्टिव्हिटीच्या फी कशासाठी घेता, असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे.
ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:32 AM