महिला डब्यात पुरुष विक्रेत्यांची घुसखोरी
By admin | Published: June 28, 2015 09:21 PM2015-06-28T21:21:53+5:302015-06-29T07:58:35+5:30
महिलांसाठी राखीव असलेल्या लोकल डब्यात पुरुष विक्रेत्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे.
६८ विक्रेत्यांवर कारवाई : २७ केसेस शिल्लक
प्राची सोनवणे, नवी मुंबई : महिलांसाठी राखीव असलेल्या लोकल डब्यात पुरुष विक्रेत्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा तक्रार करूनही या फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नसल्याची तक्रार प्रवासी महिलांनी केली आहे. यावर्षी जानेवारीपासून ते आत्तापर्यंत नेरुळ, सानपाडा, वाशी या परिसरांतील ६८ विक्रेत्यांवर कारवाई झाली असून २७ केसेस शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.
महिला राखीव डब्यांमधील पुरुष विक्रेत्यांच्या वाढत्या घुसखोरीवर वेळच्या वेळी कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढते आहे. नवी मुंबई परिसरातील सर्वच रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्या महिलांची पुढे ही समस्या आहे. महिला डब्यात घुसणारे विक्रेते, मवाली मुले, भिकारी यांचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार महिला डब्यात पुरुषांनी प्रवास करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि यावर कारवाई देखील केली जाते, असे असतानाही रेल्वे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. भेळ, मोबाइल कव्हर, भाज्या, फळे, खाद्यपदार्थ, घरगुती वापरातील वस्तूंची विक्री करण्याच्या निमित्ताने हे पुरुष महिला डब्यात घुसतात. मवाली मुलेही दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करतात, छेड काढतात. महिलांकडून या पुरुषांना हाकलण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यावरही काही जण अरेरावी वा दमदाटी करतात.
फक्त रात्रीच्या वेळीच महिला डब्यात पोलिस असतात. इतर वेळी मात्र महिला असुरक्षितच असतात. महिला डब्यात घुसून विक्री करणार्या पुरुषांना १२०० रुपयांचा दंड आकारला जातो. परंतु प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. हे सर्वच विक्रेते तिकीट न काढताच प्रवास करतात, तरीदेखील यांच्याकडून दंड वसूल केला जात नाही, अशी तक्रार महिला प्रवाशांनी केली.
...
आरपीएफ , सिडकोची टोलवाटोलवी
आरपीएफ आणि सिडको यांच्याशी या विषयावर चर्चा केली असता दोघांनीही एकमेकांवर जबाबदारी ढकलून हात झटकले. आरपीएफच्या म्हणण्यानुसार, ही जबाबदारी जेवढी आमची आहे तेवढीच सिडकोचीही आहे. याबाबतीत सिडकोशी संपर्क साधला असता ही जबाबदारी सर्वस्वी आरपीएफची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...