बडीशेपचे दरही घसरले! जिरे-मोहरीची फोडणी झाली स्वस्त; हळदीलाही आले सोन्याचे दिवस
By नामदेव मोरे | Published: April 17, 2024 08:48 AM2024-04-17T08:48:31+5:302024-04-17T08:49:08+5:30
गतवर्षभरामध्ये मसाल्याच्या दरांमध्ये सातत्याने तेजी होत होती.
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उन्हाळ्यामध्ये वर्षभराचा चटणी मसाला, लोंची, पापड बनविण्याची तयारी करणाऱ्या गृहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर महागाईचा तडका बसलेले जिरे, मोहरीचे दर कमी झाले आहेत. यामुळे आता घरातील जेवणासह, लग्नसराईतील जेवणावळीसाठीची फोडणी स्वस्त झाली आहे.
गतवर्षभरामध्ये मसाल्याच्या दरांमध्ये सातत्याने तेजी होत होती. जिरे, मोहरीसह इतर मसाल्यांचे दरही प्रचंड वाढले होते. यामुळे गृहिणींनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करण्यासाठी हात आखडता घेतला होता. उन्हाळ्यामध्ये वर्षभराचा चटणी मसाला, लोंची, पापड केले जातात. लग्नसराईसह इतर समारंभातील फोडणीच्या मसाल्यांमध्ये जिरे, मोहरीला महत्त्वाचे स्थान असते. एक महिन्यापासून या दोन्ही मसाल्यांचे दर घसरले आहेत.
मार्चमध्ये २६५ ते ४१० रुपये किलो दराने विकले जाणाऱ्या जिऱ्याचे दर आता २०२ ते २८० रुपयांवर आले आहेत. मोहरीचे दर ५५ ते ८० वरून ५५ ते ६५ रुपये किलो झाले आहेत. बडीशेपचे दर १५० ते २८५ रुपये किलोवरून ११० ते १७० रुपयांवर आले आहेत. एक वर्षानंतर दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
- जिरे व मोहरीचे दर कमी झाले असले तरी हळदीच्या दरामध्ये तेजी आहे. गतवर्षी हळदीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी हळदीला समाधानकारक दर मिळत आहेत.
- बाजार समितीमध्ये मार्चमध्ये हळदीला १५० ते २०० रुपये किलो दर मिळत होता. आता ते १६० ते २२० रुपयांवर गेले आहेत.
बाजार समितीमधील मसाल्याचे दर
मसाल्याचे नाव मार्च एप्रिल
- जिरे २६५ ते ४१० २०२ ते २८०
- मोहरी ५० ते ८० ५५ ते ६५
- लवंग ६०० ते १५०० ७०० ते ९००
- बडीशेप १५० ते २८५ ११० ते १७०
- चिंच ७० ते ११५ ७५ ते १३०
- धने ७५ ते १६० ९० ते १७०
- हळद १५० ते २०० १६० ते २२०