नवी मुंबई : गणेशोत्सवात संकलीत होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने केला आहे. निर्माल्य वाहतुकीसाठी ४६ वाहनांची सोय केली आहे. आतापर्यंत २३ टन निर्माल्य संकलीत झाले असून आनंतचतुर्थीपर्यंत हे प्रमाण ५० टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या खताचा उपयोग महानगरपालिकेची उद्याने फुलविण्यासाठी करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मनपा क्षेत्रात २२ नैसर्गिक तलावांबरोबर १३४ कृत्रीम तलावांची निर्मीती केली आहे. प्रत्येक तलावावर निर्माल्य कलश उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी निर्माल्य, फळे व इतर साहित्य तलावामध्ये टाकू नये असे आवाहन केले आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही भावीकांना सुचना दिल्या जात आहेत. निर्माल्यातून खतनिर्मीती करण्याचाही निर्यण घेतला आहे निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी त्याची वाहतूक करण्यासाठी विभागनिहाय स्वतंत्र वाहतूक व्यवस्था केली आहे. ४६ वाहनांच्या माध्यमातून निर्माल्य तुर्भेमधील कचरा भुमीवर नेले जात आहे. तेथे त्यामूधन खतनिर्मीती केली जात आहे.
गौरी विसर्जनापर्यंत पहिल्या सहा दिवसात तब्बल २३ टन निर्माल्य संकलीत झाले आहे. अनंत चतुर्थीपर्यंत ५० टन पेक्षा जास्त निर्माल्य संकलीत होईल असा अंदाज आहे. निर्माल्यातून तयार होणाऱ्या खताचा उद्यानांसाठी व इतर ठिकाणी उपयोग केला जाणार आहे. निर्माल्याचे पावित्र्य राखले जावे, तलावांमधील प्रदुषण कमी व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
स्वयंसेवी संस्थांचाही आधारमहानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली आहे. वाशी, कोपरखैरणे व नेरूळ मध्ये स्वयंसेवी संस्थांनी विसर्जन स्थळावरच कंपोस्ट पिट तयार केले असून त्याच ठिकाणी निर्माल्यातून खतनिर्मीती केली जात आहे.
विभागनिहाय निर्माल्य वाहतुकीसाठी व्यवस्था
विभाग - वाहनांची संख्या
बेलापूर - ६
नेरूळ - ७
तुर्भे - ६
वाशी - ७
कोपरखैरणे - ४
घणसोली - ६
ऐरोली - ६
दिघा - ४
नवी मुंबई महानगरपालिकेने निर्माल्य व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. निर्माल्यातून खत निर्मिती करून त्याचा उपयोग उद्यान व इतर ठिकाणी केला जाणार आहे. गौरी विसर्जनापर्यंत २३ टन निर्माल्य संकलित झाले आहे.बाबासाहेब राजळे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन