शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव
By admin | Published: January 20, 2016 02:11 AM2016-01-20T02:11:34+5:302016-01-20T02:11:34+5:30
शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढतच चालला असून गतवर्षात अशा ३३४ प्राण्यांची पालिकेने धरपकड केली आहे. त्यापैकी मालकी हक्क असलेल्या प्राण्यांच्या मालकांकडून
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढतच चालला असून गतवर्षात अशा ३३४ प्राण्यांची पालिकेने धरपकड केली आहे. त्यापैकी मालकी हक्क असलेल्या प्राण्यांच्या मालकांकडून १ लाख ४९ हजार दंड स्वरूपात जमा झाले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट जनावरांचे प्रमाण वाढतच आहे. भाजी मार्केट, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर फिरणाऱ्या या प्राण्यांमुळे पादचाऱ्यांसह वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असतो. अशा जनावरांना पकडण्यासाठी महापालिकेने ठेकेदार नेमले आहे. गतवर्षात एकूण ३३४ जनावरे पकडली आहेत. त्यामध्ये गाय, म्हैस, घोडे, गाढव, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर अशा प्राण्यांचा समावेश आहे. त्यापैकी ११३ जनावरे मालकी हक्काची असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून पालिकेला १ लाख ४९ हजारांची मिळकत झाली.
शहरातील अनधिकृत तबेल्यातील जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडली जातात. सार्वजनिक ठिकाणी भटकणारे हे प्राणीही पालिकेने ताब्यात घेतले. अशा प्रकारे गतवर्षी ८६ गायी-म्हशी, २१ घोडे व गाढव, ३९ शेळ्या-मेंढ्या पकडण्यात आलेल्या आहेत. तर १८८डुक्कर पकडून ते देवनारच्या कत्तलखान्यात पाठवलेली आहेत. तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशा इतर जनावरांना वाशी गावातील कोंडवाड्यात जमा करून ठरावीक मुदतीनंतर गोशाळेत पाठवण्यात आले आहे. वराह हा घाणीत वाढणारा व उपद्रवी प्राणी असल्याने त्याच्या पालनाला महापालिकेची परवानगी नाही. यामुळे पकडलेले वराह देवनारच्या कत्तलखान्यात पाठवले जातात. दिघा, रबाळे व एमआयडीसी परिसरात अनेकांनी विनापरवाना वराहांचे पालन केलेले आहे. यामुळे त्याठिकाणी कारवाईदरम्यान होणारे वाद टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्तात मोकाट डुक्कर पकडले जात आहेत.