नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी मधील प्रशांत थर्मो प्लास्टिक कंपनीला शुक्रवारी दुपारी आग लागली. आगीत एकजण भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. कंपनीतील प्लास्टिकचे साहित्य व केमिकलचा साठा यांनी पेट घेतल्याने आग अधिक भडकून शेजारच्या कंपनीत देखील पसरल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास प्रशांत थर्मो कंपनीत आग लागली. कंपनीत वापरले जाणारे दोन अति ज्वलनशील केमिकल एकमेकालगत ठेवल्याने हि आग लागल्याचे समजते. दरम्यान आगीच्या सुरवातीला उडालेल्या भडक्यामुळे अमरीश कश्यप (२५) हा कामगार भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमध्ये कंपनीतील केमिकल व प्लास्टिकच्या साठ्याने पेट घेतल्याने काही वेळातच आग संपूर्ण कंपनीत पसरली. आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी, महापालिका टीबीआय व रिलायन्स यांचे अग्निशमन दल व रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आगीचे रौद्रय रूप पाहून सुरक्षेखातर लगतच्या कंपन्या देखील रिकाम्या करण्यात आल्या. तर प्रशांत थर्मो कंपनीतील केमिकलचे ड्रम देखील बाहेर काढून संभाव्य धोका टाळण्यात आला. मात्र आगीच्या भडक्यानी प्रशांत थर्मो कंपनीच्या बाजूलास असलेल्या स्प्रेटेक या कंपनीत देखील आग पसरली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अग्निशम दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते.