सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरात होत असलेल्या ‘फिफा’च्या निमित्ताने पालिकेकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. अवघ्या ‘फिफा’च्या निमित्ताने होणाºया वॉकेथॉनसाठी खासगी व पालिका शाळांचा एक पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत पालकांमध्ये नाराजी पसरली असून, शिक्षण मंडळाने सर्व शाळांवर सक्तीने लादलेला हा सक्तीचाच निर्णय असल्याचा संताप व्यक्त होत आहे.देशात प्रथमच होत असलेल्या ‘फिफा’च्या सामन्यांचे यजमानपद मिळाल्याने नवी मुंबईच्या लौकिकतेत भर पडणार आहे. मात्र, यानिमित्ताने शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत खेळ होत असल्याचा संताप पालकांकडून व्यक्त होत आहे. ६ आॅक्टोबरपासून हे सामने सुरू होत असून, एकून आठ सामने नवी मुंबईत खेळले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून ५ आॅक्टोबर रोजी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमधून आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश प्रसारित केला जाणार आहे. त्यामध्ये पालिका क्षेत्रातील ११२ शाळांमधील ३५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचा हा सहभाग उत्स्फूर्त नसून, सक्तीचा असल्याची बाब समोर आली आहे. वॉकेथॉनच्या अनुषंघाने सर्व शाळांच्या प्रतिनिधींची पालिकेत बैठक घेण्यात आली होती. या वेळी काही खासगी शाळांच्या प्रतिनिधींनी ५ तारखेला परीक्षा असल्याचे सांगितले. त्यामुळे पालिका अधिकाºयांचा हा अट्टाहास नेमका कशासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गुरुवारी बहुतांश खासगी शाळांचा सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा पेपर निश्चित झालेला होता. तर पालिका शाळेच्या नववी व दहावीचा गणित व इतिहासाचा पेपर ठरलेला होता; परंतु वॉकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग दर्शवायचा असल्यामुळे त्या दिवसाचा पेपर रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. यानुसार खासगी शाळांचा रद्द झालेला पेपर १२ तारखेला, तर पालिका शाळेचा पेपर १४ तारखेला घेतला जाणार असून त्यानंतर विद्यार्थ्यांना दीपावलीची सुट्टी घोषित केली जाणार आहे. यामुळे ‘फिफा’चे यजमानपद भूषवण्याच्या नादात शिक्षण मंडळाने शालेय परीक्षेचाच फुटबॉल केल्याचे दिसून येत आहे. ‘फिफा’च्या सामन्यांची तारीख काही महिने अगोदरच घोषित झालेली होती. यामुळे जर ‘फिफा’च्या पार्श्वभूमीवर वॉकेथॉन घेऊन त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करायचे होते, तर त्याच काळात परीक्षा ठेवल्या कशाला? असा संताप पालकांकडून व्यक्त होत आहे. यामुळे ‘फिफा’ फिव्हरचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार नाही ना? याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाण्याची गरजही व्यक्त होत आहे. या संदर्भात शिक्षणअधिकारी संदीप संगवी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.अधिकाºयांची दिरंगाई‘फिफा’चे सामने नवी मुंबईमध्ये होणार असल्याचे काही महिन्यांपूर्वीच निश्चित झाले होते. पालिकेच्या शिक्षण विभागाने वॉकेथॉनचे नियोजन वेळेत केले नाही. सर्व खासगी शाळांनी त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केल्यानंतर एका आठवड्यापूर्वी अचानक वॉकेथॉन घेण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी आयोजित बैठकीमध्येही काही शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी परीक्षा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते; परंतु त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यास सांगण्यात आले. शिक्षण विभागाने वेळेत निर्णय घेतला असता, तर किमान विद्यार्थ्यांची गैरसोय झाली नसती, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.
‘फिफा’साठी शालेय परीक्षेचा झाला ‘फुटबॉल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 2:29 AM