नामदेव मोरे नवी मुंबई : ‘फिफा’ सामन्यांच्या निमित्ताने नवी मुंबईचा नावलौकिक जागतिक स्तरावर होऊ लागला आहे. डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. मैदानाच्या रचनेसह ते तयार करण्यासाठी अफ्रिकेवरून मागविण्यात आलेल्या मातीपर्यंत सर्वच चर्चेचा विषय ठरले आहे.नवी मुंबईला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणाºया प्रमुख लँड मार्कमध्ये डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमचा समावेश झाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर नेरुळनजीक असलेल्या स्टेडिअमच्या जागेवर २००५ पर्यंत खंडर झालेला भूखंड होता. हा भूखंड डी. वाय. पाटील समूहाला सिडकोने मैदान विकसित करण्यासाठी दिला. विजय पाटील यांनी या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडिअम विकसित केले आहे. ४ मार्च २००८ ला मैदानाचे लोकार्पण करण्यात आले. जगातील सर्वोत्तम मैदानांमध्ये याचा समावेश होऊ लागला असून, ५५ हजार प्रेक्षक बसतील एवढी क्षमता आहे. ‘फिफा’चे ८ सामने या ठिकाणी होत असल्याने जगभरातील क्रीडा रसिक येथे येऊ लागले आहेत. यापूर्वी २०१०मध्ये आयपीएलच्या सहा मॅचेस या ठिकाणी झाल्या आहेत. ११ नोव्हेंबर २००९मध्ये येथे आॅस्ट्रेलिया व भारत यांच्यामध्ये एकदिवसीय क्रिकेट मॅच होणार होती; परंतु पावसामुळे ती रद्द झाली. याच मैदानावर जस्टिन बिबर, हार्डवेल, ए. आर. रहेमान यांच्यासह अनेक दिग्गजांचे मोठे कार्यक्रम झाले आहेत. दास संप्रदायाचे गिनीजबुकमध्ये नोंद झालेले आरोग्य शिबिरही येथेच घेण्यात आले होते. कोणताही कार्यक्रम घेतला तरी पंधरा दिवसांमध्ये पुन्हा क्रिकेट किंवा फुटबॉल सामने घेता येतील, अशा पद्धतीने मैदानाची रचना करण्यात आली आहे.डॉ.डी. वाय. पाटील स्टेडिअम रचना व सुविधेसाठी जगातील प्रमुख ८ स्टेडिअममध्ये गनले जात आहे. २००८ पासून मैदानाची देखभाल करण्यासाठी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १५ तज्ज्ञांची टीम कार्यरत असून, शेकडो कामगार रोज मैदानाची देखभाल करण्यासाठी तैनात आहेत. वृंदन जाधव, माजी क्रिकेटपटू अॅबी कुरवीला यांच्यासह अनेक तज्ज्ञ यासाठी मेहनत घेत आहेत. यामुळेच जस्टिन बिबरचा कार्यक्रम झाल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये ‘फिफा’ची टीम पाहणी करण्यासाठी आली होती. ‘फिफा’च्या समितीने या मैदानालाच पसंती दिल्याने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने नवी मुंबईकरांना पाहण्याची संधी प्राप्त झाली असून येथे येणारे नागरिकही मैदानावरील सुविधा पाहून समाधान व्यक्त करू लागले आहेत.
‘फिफा’मुळे जगभरात नवी मुंबईचा नावलौकिक, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 3:13 AM