देहरंग धरणात पंधरा दिवसांचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:29 PM2020-05-30T23:29:50+5:302020-05-30T23:30:13+5:30

शहरातील पाणीटंचाई टळली । पनवेल महापालिकेचे नियोजन; यंदा एमजेपीकडूनही मिळाला वाढीव पाणीकोटा

Fifteen days water stock in Deharang dam | देहरंग धरणात पंधरा दिवसांचा साठा

देहरंग धरणात पंधरा दिवसांचा साठा

Next

अरुणकुमार मेहत्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल महापालिका पाण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी व स्वमालकीच्या देहरंग धरणावर अवलंबून आहे. गतवर्षीपेक्षा यंदा एमजेपीकडून मिळत असलेल्या पाण्याचा कोटा वाढवून घेतल्याने, देहरंग धरणातील पाणीसाठा जूनपर्यंत पुरविण्यात महापालिकेला यश आले आहे. सद्य:स्थितीत १५ दिवस पाणी पुरेल इतका साठा देहरंग धरणात आहे.


महापालिकेकडून पाण्याचे नियोजन केल्यामुळे यंदा पनवेल शहरात पाणीटंचाई निर्माण झाली नाही. लॉकडाउन काळात रहिवाशांना मुबलक पाणी मिळाल्याने पनवेलकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
पनवेलपासून १५ किमी अंतरावर असलेल्या देहरंग धरणातून जलवाहिनीद्वारे पुरवठा केला जातो. जलाशयात एकूण ३.५७ दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. पनवेल शहरास ३२ एमएलडी पाण्याची गरज आहे. देहरंग व्यतिरिक्त इतर पाण्याच्या तरतुदीसाठी महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते.


गतवर्षी एमजेपीकडून ८ एमएलडी पाणी मिळत होते. तर एमआयडीसीकडून ५.५ एमएलडी पाणी मिळते. उर्वरित पाणी देहरंग धरणातून घेतले जायचे. शहरात गरजेनुसार पाणीपुरवठा केला जायचा. परंतु एप्रिल -मे महिन्यांतच देहरंग धरण तळ गाठत असल्याने पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.
दरवर्षी रहिवाशांच्या रोषाचा महापालिकेला सामना करावा लागत होता. त्यात एमजेपीकडून कामाकरिता शटडाउन घेतला तर टंचाईत आणखीनच भर पडायची. पावसाळा लांबला तर पाण्याचे नियोजन फोल ठरायचे. यंदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ७ एमएलडी पाण्याचा कोटा वाढविल्यामुळे देहरंग धरणातील पाण्याचा वापर कमी करण्यात आला. ते पाणी साठवून ठेवल्याने जूनपर्यंत पाणी मिळत आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे लॉकडाउन काळातदेखील पाणीटंचाई भासली नसल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.


 

Web Title: Fifteen days water stock in Deharang dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको