लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गणेश चतुर्थंच्या मुहूर्तावर सिडकोने जाहिर केलेल्या चार हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ४ नोव्हेंबरची अंतिम मुदत होती. या कालावधीत पंधरा हजारापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने स्पष्ट केले आहे. या योजनेची २२ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
सिडकोच्या गृहयोजनेची सर्वसामान्य ग्राहकांना नेहमीच प्रतिक्षा असते. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने विविध गृहप्रकल्पातील शिल्लक असलेल्या ४१५8 घरांची योजना जाहिर केली होती. नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. एकूण ४१५८ घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर उर्वरित ३७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती.
या कालावधीत सिडकोच्या संबधित विभागाकडे पंधरा हजार अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, प्राप्त अर्जची स्वीकृत प्रारूप यादी १४ नोव्हेंबर रोजी तर स्वीकृत अंतिम यादी १६ नोव्हेंबर रोजी जाहिर केली जाणार आहे. त्यानंतर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे सिडकोने कळविले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"