कमलाकर कांबळे / नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या विविध मार्गांवरून धावणाऱ्या गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कोकण रेल्वेने धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत एप्रिल महिन्यात १५ हजार १२९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या अंतर्गत संबंधितांकडून २ कोटी ६९ लाख ८५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरील गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रत्येक गाड्यांतून नियमित तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने जानेवारी महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ९,५४८ प्रवाशांवर कारवाई करून, त्यांच्याकडून सुमारे २ कोटी १८ लाखांचा दंड वसूल केला होता. आता एप्रिल महिन्यात १५ हजार १२९ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, प्रत्येक मार्गावरील गाड्यांतून ही तपासणी मोहीम नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.